घरातील जळालेले वीज मीटर बदलवून देण्यासाठी ग्राहकाकडे सहा हजार रुपयांची मागणी करणाऱ्या महावितरणच्या मालेगाव कार्यालयातील सहाय्यक अभियंता भरत दगा वाघ याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात ताब्यात घेतले आहे. तक्रारदाराने नवीन मिटर बसवून देण्यासाठी त्यांनी अर्ज केला होता. या कामासाठी वाघने सहा हजार रुपयांची मागणी केली. यामुळे वैतागलेल्या तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार दिली. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी सापळा रचला. महावितरणच्या कुसूंबा कक्ष कार्यालयाबाहेरील रस्त्यावर तक्रारदाराकडून ही रक्कम स्वीकारत असताना वाघला पथकाने जेरबंद केले.