हजरत मोहम्मद पगंबर यांचे नातू हजरत इमाम हुसेन व त्यांच्या ७२ जणांच्या कुटुंबीयांनी सत्यासाठी अन्यायाविरूध्द केलेल्या बलिदानाच्या पवित्र स्मृती जपणा-या मोहरम उत्सवाची सांगता सोलापूर शहर व जिल्ह्य़त मंगलमय वातावरणात झाली. या निमित्ताने गेले पाच दिवस विविध पंजे, ताबूत व डोल्यांच्या मिरवणुका काढण्यात आल्या. या उत्सवातून हिंदू-मुस्लिमांचा ऐक्यभाव, सद्भावना तथा सामाजिक सलोख्याचे दर्शन घडले.
शहरात मोहरम कमिटीच्या अधिपत्याखाली सुमारे २५० पंजे, सवा-यांची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. यात इमाम हुसेन, इमाम कासीम, अकबरअली, मौलाअली, नाले हैदर, नालसाहेब, मुस्लीम पंजे, अब्बासअली आदी पंजांचा प्रामुख्याने सहभाग होता. याशिवाय पीर बडा मंगलबेडा (अहले हरम), दादापीर, घोडेपीर या पंजांची पारंपरिक पध्दतीने प्रतिष्ठापना करण्यात आली होती. अनेक मानाच्या पंजांचे शेकडो भाविकांनी दर्शन घेऊन नवेद्य अर्पण केले. नवसही फेडण्यात आले.
शुक्रवारी मोहरमच्या ‘शाहदत’ दिनी पहाटे शनिवार पेठेतील दुर्वेश मशिदीतून दुर्वेश पंजांची पेटत्या मशालींसह धावती मिरवणूक निघाली होती. पन्नास मशाली घेऊन धावणारी ही मिरवणूक पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा हजारोंची गर्दी उसळली होती. त्यानंतर थोरला मंगळवेढा तालीम येथून पीर बडा मंगलबेडा (अहले हरम) सवारीचा मिरवणूक सोहळा मंगलमय वातावरणात पार पडला. संस्कृत पंडित गुलाम दस्तगीर बिराजदार व कवी बदिउज्जमा बिराजदार यांनी फातेहाखानीचा विधी पूर्ण केल्यानंतर ताशा व हलग्यांचा कडकडाट व संगीत बॅन्ड पथकाच्या सुमधुर संगीताच्या तालावर मिरवणूकीस प्रारंभ झाला. अ‍ॅड. जयदीप माने, नगरसेवक पद्माकर काळे, शिवसेना शहर प्रमुख प्रताप चव्हाण, संकेत पिसे, शैलेश पिसे, बिज्जू प्रधाने, सतीश प्रधाने, अमर धंगेकर, संभाजी नाना िशदे, शरद दीक्षित, सरगिरो मुर्शद, गफ्फारशाह कादरी, शहर कुरेश जमातीचे अध्यक्ष अय्युब कुरेशी, भाईलाल तासगावकर, विजय सागर, सुनील शेळके, सदाशिव येलुरे, दत्तात्रेय साबळे आदींचा मिरवणुकीत सहभाग होता. अग्रभागी हिरवे व भगवे निशाण हाती घेतलेले दोन घोडेस्वार होते. मिरवणूक मार्गावर शेकडो महिला भाविकांनी जलकुंभाद्वारे सवारीची पदप्रक्षालन केले. पारंपरिक मार्गावरून निघालेली ही मिरवणूक आसार शरीफ येथे पोहोचल्यानंतर तेथील मुतवल्ली शकील मौलबी यांनी फातेहाखानी केली. त्यानंतर वाजत गाजत हे मिरवणूक पूर्वस्थळी पोहोचली. पोलीस आयुक्त प्रदीप रासकर व पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे आदींच्या उपस्थितीत मिरवणुकीचा समारोप झाला. या वेळी सहायक पोलीस आयुक्त कुशालचंद बाहेती, तिवटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरूण वायकर आदी उपस्थित होते. सामाजिक ऐक्याचे प्रतीक ठरणा-या मिरवणूक सोहळयाची पोलीस आयुक्त रासकर यांनी मुक्तकंठाने प्रशंसा केली. संयोजक एजाजहुसेन मुजावर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
सायंकाळी बुधवार बाजार-भारतीय चौकात थोरल्या व धाकटया तलवार पंजांच्या भेटीचा सोहळा पार पडला. या वेळी छोटया यजमानातून संपूर्ण सोहळयावर पुष्पवृष्टी करण्यात आली. याशिवाय जिंदाशाह मदार चौकातही विमानातून मिरवणुकीवर पुष्पवृष्टी झाली. या वेळी हजारो भाविकांची गर्दी उसळली होती. दिवसभर छोटया मोठय़ा सवा-यांच्या मिरवणुका वाजत गाजत आसार शरीफ येथे पोहोचल्या. सायंकाळी ते रात्री उशिरापर्यंत सवा-यांच्या विसर्जन मिरवणुका चालू होत्या. विजापूर वेस, माणिक चौक, हजीमाही चौक, दत्त चौक आदी भागात गर्दीच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त मोठया प्रमाणात तनात करण्यात आला होता.