सत्यासाठी अन्यायाविरुद्ध लढताना सामान्य गोरगरीब व वंचितांना न्याय मिळवून देण्याची प्रेरणा तथा शिकवण मोहरम उत्सवातून मिळते, असे उद्गार राष्ट्रवादीचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांनी काढले.
   मोहरम उत्सवानिमित्त शनिवार पेठेतील दुर्वेश मशिदीजवळ शहर मोहरम कमिटी व डॉ. इकबाल क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी भाविकांना ‘खिचडा’ महाप्रसाद वाटप करण्यात आले. या उपक्रमाचा शुभारंभ मोहिते-पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी शहर काझी सय्यद अहमदअली काझी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष चंद्रकांत दायमा, युनियन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अ‍ॅड. जैद अहमद शेख आदींची उपस्थिती होती. मोहरम कमिटीचे अध्यक्ष, माजी महापौर खाजादाऊद नालबंद यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
    सत्यासाठी अन्यायाविरुद्ध लढा देऊन आपल्या कुटुंबीयातील ७२ जणांसह हौतात्म्य पत्करणाऱ्या हजरत इमाम हुसेन यांच्या पवित्र स्मृती मोहरम उत्सवात जागविल्या जातात. हा मोहरम उत्सव केवळ मुस्लिमांचा नाही तर िहदूंचाही आहे. त्यात जातिधर्माचा कसलाही भेदभाव नसतो, असे मोहिते-पाटील यांनी नमूद केले. सामाजिक ऐक्य, सद्भावना आणि बंधुभावाची जोपासना करण्याबरोबरच सामान्य गोरगरिबांना न्याय मिळवून देणे आणि त्यांचा सामाजिक व आíथक स्तर उंचावण्याची शिकवण मोहरममधून मिळते, असेही त्यांनी सांगितले. या वेळी शहर काझी सय्यद अहमदअली काझी यांनी तत्त्वचिंतन केले. मौलाना एजाज कुरेशी व हाफिज मोहम्मद गौस यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमास नगरसेवक प्रवीण डोंगरे, पीर अहमद शेख, कय्युम बुरहाण, लता फुटाणे यांच्यासह शेकडो भाविक व कार्यकत्रे उपस्थित होते.