News Flash

मुक्ताईनगरच्या बंद सिंचन योजनेला पुन्हा निधी

सिंचन घोटाळ्यामुळे चर्चेत आलेल्या आणि पूर्ण होऊनही थोडी थोडकी नव्हे तर, ११ वर्ष केवळ बंद राहिलेल्या मुक्ताईनगर उपसा सिंचन योजनेच्या दुरुस्तीसाठी

| December 21, 2013 03:25 am

सिंचन घोटाळ्यामुळे चर्चेत आलेल्या आणि पूर्ण होऊनही थोडी थोडकी नव्हे तर, ११ वर्ष केवळ बंद राहिलेल्या मुक्ताईनगर उपसा सिंचन योजनेच्या दुरुस्तीसाठी ६० लाख रुपयांचा खर्च करण्यास राज्य शासनाने हिरवा कंदील दाखविला आहे. युतीची सत्ता असताना आणि एकनाथ खडसे हे पाटबंधारे विभागाची धूरा सांभाळत असताना ही योजना साकारली गेली होती. या योजनेची काही गरज नसताना त्यावर अनाठायी खर्च झाल्याची ओरड सिंचन घोटाळा उघड झाल्यानंतर केली जात होती. सिंचन प्रकल्पांच्या चौकशीचे काम सुरू असताना कोटय़वधींचा खर्च होऊन बंद पडलेल्या या योजनेवर पुन्हा एकदा शासन पैसे खर्च करणार आहे.
उपसा सिंचन ही अपयशी ठरलेली योजना असल्याचे ज्ञात असूनही तापी खोरे विकास महामंडळाने या पद्धतीच्या तीन ते चार मोठय़ा उपसा सिंचन योजनांची कामे सुरू केल्याचा आरोप आधीच तांत्रिक सल्लागार समितीचे सदस्य विजय पांढरे यांनी केला होता. वरणगांव तळवेल उपसा योजना, कुऱ्हा वडोदा उपसा, सुलवाडे उपसा, बोदवड उपसा सिंचन योजना ही त्याची काही उदाहरणे त्यांनी दिली होती. अंदाजपत्रक, सर्व निविदातील अतिरिक्त साहित्याचे दरपत्रक, अंदाजपत्रकांच्या वाढलेल्या किंमती, लाभ-खर्च रेषो, उपसा सिंचन योजनांची खर्चिक अंदाजपत्रके यांची सखोल चौकशी करण्याची मागणी केली गेली होती.
तापी खोरे विकास महामंडळाने साकारलेल्या मुक्ताईनगर उपसा सिंचन योजनेबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले. विद्यमान विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे युती शासनाच्या काळात पाटबंधारे विभागाची धूरा सांभाळत असताना या योजनेवर मोठा खर्च झाल्याचा आक्षेप पांढरे यांनी शासनाला पाठविलेल्या पत्रात नोंदविला होता. सिंचन घोटाळ्याच्या चौकशीची मागणी करत विरोधकांनी शासनाला कोंडीत पकडले. त्यावरून आता संपूर्ण राज्यातील सिंचन प्रकल्पात झालेल्या अनियमिततांची चौकशी सुरू आहे. असे असताना राज्य शासनाने दशकभरापासून बंद असलेल्या योजनेवर पुन्हा पैसे खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे.
पूर्णा नदीवरील मुक्ताईनगर गावाजवळ असलेली योजना पूर्ण होऊन ११ वर्षांचा कालावधी उलटला आहे. या योजनेद्वारे मुक्तानगर तालुक्यातील सात गावातील ३३६० हेक्टर सिंचनयोग्य क्षेत्रास सिंचनासाठी पाणी देणे प्रस्तावित आहे. आतापर्यंत केवळ दोन ते तीन वेळा सिंचनासाठी पाणी सोडण्यात आल्याचे खुद्द शासनाने मान्य केले आहे.
देखभाल व दुरूस्तीअभावी बंद असणाऱ्या या योजनेसाठी पुन्हा एकदा आपले हात रिते केले आहेत. योजनेच्या स्थापत्य कामांच्या दुरुस्तीसाठी पंपगृहाची दुरूस्ती, उध्दरण नलीका दुरुस्ती आणि गाळ काढण्याचे काम हाती घेण्यात
आले आहे. परंतु, ही योजना विद्युत
कामांच्या दुरुस्तीशिवाय कार्यान्वित होऊ शकत नाही.
त्यामुळे संबंधित कामांनाही मान्यता देण्यात आली आहे. मुक्ताईनगर उपसा सिंचन प्रकल्पाच्या विद्युत व अभियांत्रिकी उपकरणांच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामाकरिता ६० लाखाच्या खर्चाच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 21, 2013 3:25 am

Web Title: muktainagar struck water supply scheme gets fund
Next Stories
1 सिडकोतील पेठे विद्यालयाकडून उपाय योजनांची प्रतिक्षा
2 गंगापूर बोट क्लबचा विषय विधानसभेत गाजला
3 सार्वजनिक सेवा वीज दराची सव्वा वर्षांपासून प्रतिक्षा
Just Now!
X