मल्टीस्टेट पतसंस्थांसाठी आचारसंहिता तयार करून स्वत:वर काही बंधने घालून घेण्याचा तसेच मल्टीस्टेट पतसंस्थांची देशव्यापी संघटना स्थापन करण्याचा निर्णय शिर्डी येथे झालेल्या महाराष्ट्रातील मल्टीस्टेट पतसंस्था पदाधिकाऱ्यांच्या परिषदेत घेण्यात आला. राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांनी ही माहिती  दिली.
परिषदेच्या अध्यक्षस्थानी बुलढाणा मल्टीस्टेट क्रेडीट सोसायटीचे अध्यक्ष राधेशामची चांडक होते. उद्घाटन निशांत मल्टीस्टेट सोसायटीचे (अकोले) प्रकाश पोहरे यांच्या हस्ते झाले.  
राज्यातील मल्टीस्टेट को-ऑप सोसायटीचे हे पहिलेच अधिवेशन असून महाराष्ट्रात सुरू झालेल्या मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट पतसंस्थांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे. यासंदर्भात दिशा निश्चित करण्यासाठी व त्यावर मार्गदर्शन करण्यासाठी काकांनी नेतृत्व स्वीकाराव अशी विनंती सदर बैठकीत करण्यात आली. कोयटे म्हणाले, महाराष्ट्रात सध्या २९७ मल्टीस्टेट पतसंस्था आहेत. त्या वेगाने वाढत आहेत. या संस्थांमध्ये १० ते १२ हजार कोटी रुपयांच्या ठेवी असून आता संस्थांच्या गुणात्मक वाढीसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.  या वेळी उद्घाटक प्रकाश पोहरे, राधेश्याम चांडक यांची भाषणे झाली.