01 December 2020

News Flash

दंगलीनंतरचा मुंबईचा बदललेला चेहरामोहरा संकेतस्थळावर

आठवडाभरापूर्वी लालबागमध्ये दोन गटांमध्ये झालेल्या चकमकीचा सुदैवाने पोलिसांच्या सतर्कतेने भडका उडाला नाही.

| January 10, 2015 06:50 am

आठवडाभरापूर्वी लालबागमध्ये दोन गटांमध्ये झालेल्या चकमकीचा सुदैवाने पोलिसांच्या सतर्कतेने भडका उडाला नाही. पण, ही घटना घडताच सोशल मीडियावर ज्या वेगाने ती उलटसुलट पद्धतीने सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवली गेली ते वाचून सुजाण मुंबईकरांच्या मनात १९९२-९३च्या दंगलींच्या कटू आठवणी निश्चितपणे तरळून गेल्या असतील. बाबरी मशीद पाडल्यानंतर मुंबईत उसळलेल्या जातीय दंगलींना २२ वर्षे होऊन गेली आहेत. दंगलींमुळे या २२ वर्षांमध्ये मुंबईचा जो चेहरामोहरा बदलत गेला आहे तो टिपण्याचे काम ‘टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल स्टडीज’च्या (टिस) विद्यार्थ्यांनी केले आहे. ‘१९९२ आठविताना’ (रिमेंबरिंग १९९२) या नावाचे संकेतस्थळ या विद्यार्थ्यांनी विकसित केले असून त्यावर दंगलींशी संबंधित अनेक आठवणींना उजाळा देण्याचे काम करण्यात आले आहे.
बाबरी मशीद पाडल्यानंतर मुंबईत डिसेंबर १९९२ आणि त्यानंतर जानेवारी १९९३मध्ये उसळलेल्या दंगली अजूनही मुंबईकरांच्या मनात ठसठसणारी जखम आहे. मुंबईकरांच्या मनात कायमच्या कोरल्या गेलेल्या या घटनेची एकत्रित माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी केला आहे. या शिवाय स्वत: विद्यार्थ्यांनी तयार केलेले माहितीपटदेखील या संकेतस्थळावर पाहता येतील.
टिसच्या ‘स्कूल ऑफ मीडिया अ‍ॅण्ड कल्चरल स्टडीज’च्या विद्यार्थ्यांनी दोन वर्षे खपून आपल्या अंजली माँटेरो आणि के. पी. जयशंकर या अध्यापकांच्या मदतीने हे संकेतस्थळ विकसित केले आहे.
६ डिसेंबर १९९२ साली बाबरी मशीद पाडल्यानंतर मुंबईतील वातावरण दंगली पेटेपर्यंत कसे तापत गेले, याचा आढावा यावर घेण्यात आला आहे. यावर स्वतंत्रपणे भाष्य करण्याऐवजी या दंगली व त्यानंतर घडलेल्या घटनांवर जे माहितीपट, वर्तमानपत्रातील बातम्या, अभ्यास केले गेले यांचे संकलन या संकेतस्थळावर करण्यात आले आहे.
या शिवाय दंगलींमुळे या शहराचा चेहरामोहरा कसा बदलत गेला याचा नकाशांच्या मदतीने आढावा घेण्यात आला आहे. या दंगलींमध्ये होरपळलेल्यांनी आपले आयुष्य पुन्हा कसे उभे केले याच्या कथा संकेतस्थळावर आहेत. तसेच, न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्यांच्या मुलाखतीही यावर वाचता येतील. या दंगलींवरचा श्रीकृष्ण आयोगाचा अहवाल, न्या. श्रीकृष्ण, माजी पोलीस आयुक्त ज्युलिओ रिबेरो आदींच्या मुलाखती या संकेतस्थळावर एकत्र करण्यात आल्या आहेत.
या शिवाय विस्कळीत झालेल्या वस्त्या, शहरांचे जातीय ध्रुवीकरण, न्यायासाठीचा लढा, शहरात शांतता नांदण्यासाठी नागरिकांनी व पत्रकारांनी केलेले प्रयत्न यांचाही समावेश करण्यात आला आहे. ज्या वार्ताहरांनी, छायाचित्रकारांनी तो काळ अनुभवला त्यांनाही विद्यार्थ्यांनी मुलाखतीच्या माध्यमातून बोलते केले आहे. http://mumbairiots.tiss.edu या संकेतस्थळावर ही सर्व माहिती विद्यार्थ्यांनी उपलब्ध करून दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 10, 2015 6:50 am

Web Title: mumbai after 1993 riots
टॅग Social Media
Next Stories
1 संयुक्त महाराष्ट्र स्मृतिदालनाचा एमटीडीसीच्या यादीत समावेश करण्यासाठी मनसेचा पुढाकार
2 ट्रकखाली चिरडल्याने मुलाचा मृत्यू मृतदेह लपविण्याचा प्रयत्न
3 अभिनेत्रीवर बलात्कार करणाऱ्या निर्मात्यास अटक
Just Now!
X