28 September 2020

News Flash

पुणे लाचखोरीत अव्वल; तर मुंबई सगळ्यात मागे

लाचलुचपत प्रतिबंधात्मक खात्याने सापळा रचून लाचखोरांना पकडण्याची धडक मोहीम सुरू केली असून गेल्या दीड वर्षांत सुमारे १,७९० जणांविरुद्ध लाच प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

| June 13, 2015 02:16 am

लाचलुचपत प्रतिबंधात्मक खात्याने सापळा रचून लाचखोरांना पकडण्याची धडक मोहीम सुरू केली असून गेल्या दीड वर्षांत सुमारे १,७९० जणांविरुद्ध लाच प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या यादीत सर्वाधिक ३२१ गुन्हे पुण्यातील लाचखोरांविरुद्ध नोंदविण्यात आले आहेत. तर मुंबईत सर्वात कमी म्हणजे १११ जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. लाच प्रकरणी अटक करण्यात आलेल्यांमध्ये महसूल विभाग आणि पोलीस दलातील लाचखोरांची संख्या अधिक असल्याचे अहवालावरुन उघडकीस आले आहे. लाच मागणाऱ्यांविरुद्ध तक्रार करणाऱ्यांमध्ये महिलांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचेही अहवालावरुन निदर्शनास आले आहे.
लाचखोरांना प्रतिबंध घालण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाने विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्यामुळे तक्रारी वाढल्या असून लाचखोर मोठय़ा संख्येने लाच घेताना सापळ्यात अडकत आहेत. गेल्या दीड वर्षांत म्हणजे १ जानेवारी २०१४ ते १० जून २०१५ या कालावधीत १,७९० जणांना लाच घेतांना रंगेहाथ पकडण्यात आले होते. त्यात सर्वाधिक लाचखोर पुण्यात (३२१) तर सर्वात कमी लाचखोर मुंबईत (१११) सापडले आहेत. लाचलुचपत प्रतिबंधात्मक खात्याच्या राज्यातील एकूण आठ विभागांमार्फत ही कारवाई करण्यात येत आहे.
या लाचखोरांमध्ये सर्वाधिक तलाठय़ांचा समावेश आहे. एकूण ४० तलाठय़ांना लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे. याशिवाय डॉक्टर (४०), अभियंते (११७), शिक्षक (५१), वकील (१५) सरपंच (२१) नगराध्यक्ष (६), सभापती (४) यांचा समावेश आहे. तक्रार करणाऱ्यांमध्ये ५१ टक्के तक्रारदार या महिला असून ४५ टक्के ज्येष्ठ नागरिक आहेत.लाचखोरीमध्ये नेहमीप्रमाणे महसूल विभाग आघाडीवरच आहे. महसूल विभागातील ६०२ जणांना अटक करण्यात आली होती. महसूल पाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर पोलिसांचा क्रमांक आहे. एकूण ५६५ पोलिसांना लाच घेताना अटक करण्यात आली आहे.लाच घेताना पकडण्यात आलेल्या आरोपींमध्ये पुरूष आरोपींची संख्या २ हजार ३९६ एवढी असून महिला आरोपींची संख्या १९४ एवढी आहे.

तक्रारीसाठी हेल्पलाईन सुरू
लाचखोरांविरोधात सहजपणे तक्रार करता यावी यासाठी आम्ही हेल्पलाईन, अ‍ॅप्लिकेशनचा वापर सुरू केला आहे. याशिवाय तक्रार केल्यावर कारवाई केली जाते. यामुळे नागरिकांच्या मनात विश्वास निर्माण झाला असून नागरिक निर्भयपणे पुढे येत आहेत. आता तर अगदी १०० रुपयांची लाच मागितली तरी नागरिक तक्रार करतात आणि आम्ही त्यांना सापळा रचून पकडतो.
प्रविण दीक्षित, पोलीस महासंचालक

आघाडीचे लाचखोर विभाग
(१ जाने २०१४ ते १० जून २०१५)
——————————-
शहर        गुन्ह्य़ांची संख्या
——————————-
पुणे             ३२१
नाशिक             २८५
औरंगाबाद         २४३
ठाणे             २२५
नागपूर             २२९
अमरावती         १८८
नांदेड             १८५
मुंबई             १११

१ जानेवारी ते १० जून २०१५ या कालावधीतल एकूण ५४५ जणांना लाच घेताना सापळा रचून अटक करण्यात आली आहे. त्यात महसूल (१७०), पोलीस (१५४), पालिका (३१), आरोग्य विभाग (२०) यांचा समावेश आहे.

सुहास बिऱ्हाडे, मुंबई

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 13, 2015 2:16 am

Web Title: mumbai behind for taking bribe
टॅग Bribe
Next Stories
1 वसई-विरार महानगरपालिका निवडणूक : वसई, विरारमध्ये गुजराती टक्का वाढला
2 डास प्रतिबंधात्मक उपायांबाबत टाळाटाळ करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई आयुक्तांचा इशारा
3 पुन्हा ‘सरासरी बिला’चा फेरा
Just Now!
X