बेस्ट बस आणि एसटी बंदची घोषणा झाल्यामुळे भल्या पहाटेपासूनच प्रवाशांनी बस थांब्यावर ताटकळण्याऐवजी अन्य पर्याय निवडून इच्छित स्थळ गाठण्यास सुरुवात केली होती. शिवसेना नेत्यांनी सकाळी ६ वाजता बस आगारे गाठली आणि त्यानंतर हळूहळू बसगाडय़ा आगारातून बाहेर पडू लागल्या. शिवसेनेने बंद हाणून पाडला असला तरी सकाळच्या सुमारास रस्त्यावर बसगाडय़ांची संख्या नेहमीइतकी नसल्याचे वाहतुकीवरून जाणवत होते. त्याचा काही अंशी फटका प्रवाशांना बसला.  
केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूकविषयक नव्या कायद्याला विरोध करण्यासाठी ‘नॅशनल फेडेरशन ऑफ ट्रान्सपोर्ट वर्कर्स आणि महाराष्ट्र राज्य परिवहन कामगार, अधिकारी, स्वयंरोजगारी चालक-मालक संघटना फेडरेशन’ने गुरुवारी बेस्ट बस आणि एसटी बंदची हाक दिली होती. वाहतूकदारांच्या विविध संघटना या बंदमध्ये सहभागी झाल्या होत्या. मात्र शिवसेनाप्रणीत वाहतूक संघटनांचा या बंदला पाठिंबा नव्हता. हा बंद हाणून पाडण्यासाठी शिवसेनेने कंबर कसली होती. शिवसेनेच्या वाहतूक संघटनांच्या नेत्यांनी गुरुवारी सकाळी ६ च्या सुमारास बस आगारांमध्ये धाव घेतली आणि बसगाडय़ा सोडण्यास सुरुवात केली. अनेक संपकरी कर्मचारी बस आगारांच्या बाहेर उभे होते. मात्र सोडण्यात आलेल्या बसगाडय़ांना त्यांनी कोणत्याही प्रकारचा प्रतिकार केला नाही. आगारातून किती गाडय़ा बाहेर पडत आहेत याची नोंद मात्र ते घेत होते.
बेस्ट बस आणि एसटीचा बंद असल्यामुळे गुरुवारी सकाळी मुंबईकर इच्छित स्थळी जाण्यासाठी अन्य पर्यायांचा विचार करीत होते. मात्र बेस्टची बस दिसू लागताच अनेक प्रवाशांनी बस थांब्याकडे मोर्चा वळविला. नेहमीपेक्षा गुरुवारी सकाळी रस्त्यावर धावणाऱ्या बसगाडय़ांची संख्या कमी होती. हळूहळू बसची संख्या वाढत गेली आणि प्रवाशांचा प्रवासही सुरळीत सुरू झाला.
बेस्टची बस सेवा भल्या पहाटे ३ च्या सुमारास सुरू होते. पहिल्या पाळीत काम करणारे, तसेच विविध बाजारपेठांमध्ये जाणारे आदींसाठी पहाटे ३ च्या सुमारास या बसगाडय़ा सोडण्यात येतात. मात्र बंदमुळे पहाटे ३ वाजता एकही बसगाडी आगारातून बाहेर पडली नाही. परिणामी, पहाटे ३ ते ६ या वेळेत एकही बस रस्त्यावर धावत नव्हती. शिवसेनेच्या नेत्यांनी आगारांचा ताबा घेतल्यानंतर सकाळी ७ वाजेपर्यंत ८०० बसगाडय़ा रस्त्यावर धावू लागल्या. सकाळी ११ च्या सुमारास तब्बल १२०० गाडय़ा रस्त्यावर धावत होत्या. मुंबईतील सर्व आगारांतून बाहेर पडलेल्या बसगाडय़ांची संपकरी कर्मचाऱ्यांनी केलेल्या नोंदणीच्या आधारे ही आकडेवारी ‘नॅशनल फेडेरशन ऑफ ट्रान्सपोर्ट वर्कर्स आणि महाराष्ट्र राज्य परिवहन कामगार, अधिकारी, स्वयंरोजगारी चालक-मालक संघटना फेडरेशन’चे निमंत्रक अ‍ॅड. उदयकुमार आंबोणकर यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.
बसगाडय़ा आगारातून बाहेर पडताच बेस्ट प्रशासनाने सकाळी ९.३० च्या सुमारास आपल्या ताफ्यातील सुमारे ८२ टक्के बसगाडय़ा रस्त्यावर धावत असल्याचा दावा केला. त्यानंतर १० च्या सुमारास ८६ टक्के गाडय़ा सुरू असल्याचा संदेश व्हॉट्सअपवर देण्यात आला. १०.३० च्या सुमारास तब्बल ३२०० बसगाडय़ा मुंबईकरांच्या सेवेत रुजू असल्याचा संदेश बेस्टकडून मिळाला. शिवसेनेच्या नेत्यांनी केलेला हस्तक्षेप आणि संपकऱ्यांनी विरोध न करण्याची घेतलेली भूमिका यामुळे बेस्टच्या बसगाडय़ा मुंबईकरांच्या सेवेसाठी हजर झाल्या. मात्र बेस्टने रस्त्यावर धावत असलेल्या गाडय़ांबाबत केलेला दावा किती खरा आणि किती खोटा हे गुलदस्त्यातच आहे. परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी हस्तक्षेप केल्यानंतर सकाळी ११ च्या सुमारास बंद मागे घेण्यात आला आणि त्यानंतर बेस्टची बस सेवा सुरळीत झाली.