महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाठपुराव्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे वडील आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे प्रणेते प्रबोधनकार ठाकरे यांचा अर्धपुतळा पालिका सभागृहात बसविण्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत. पालिका सभागृहाच्या नूतनीकरणानंतर प्रबोधनकार ठाकरे यांचा अर्धपुतळा तेथे बसविण्यात येणार आहे. सध्या वायफायवरून सुरू असलेल्या वादाच्या पाश्र्वभूमीवर मनसेने ‘करून दाखविल्या’मुळे शिवसेनेच्या नगरसेवकांना मुक्याने बुक्क्य़ांचा मार सहन करावा लागत आहे.
प्रबोधनकारांचा अर्धपुतळा पालिका सभागृहात बसविण्यात यावा यासाठी मनसेचे नगरसेवक चेतन कदम यांनी प्रस्ताव सादर केला होता. गेली अनेक वर्षे पालिकेत सत्ता उपभोगणाऱ्या शिवसेनेच्या एकाही नगरसेवकाने आजतागायत प्रबोधनकारांच्या अर्धपुतळा अथवा तैलचित्र पालिका सभागृहात बसविण्याची मागणी केली नव्हती. मात्र प्रबोधनकारांचा अर्धपुतळा सभागृहात बसविण्यात यावा यासाठी चेतन कदम सातत्याने पाठपुरावा करीत होते.
मनसेने एखादी मागणी अथवा प्रस्ताव सादर केल्यानंतर त्याला शिवसेनेकडून कडाडून विरोध केला जातो. संपूर्ण मुंबईत वायफाय सुविधा उपलब्ध करण्याचा शिवसेनेने संकल्प सोडला आणि मनसेने तात्काळ शिवाजी पार्क परिसरात ही सुविधा उपलब्ध करण्याची तयारी सुरू केली. शिवसेनेलाही शिवाजी पार्क परिसरातच ही सुविधा प्रायोगिक तत्वावर सुरू करावयाची होती. त्यावरून शिवसेना आणि मनसे आमनेसामने आले. अखेर पालिकेने मनसेविरुद्ध पोलिसात तक्रारही दाखल केली. मात्र शिवसेनेला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी मनसेने विलेपार्ले परिसरात ही सुविधा सुरू करण्याची घोषणा केली.
आता मनसेच्या मागणीनुसार प्रशासनाने शिवसेनाप्रमुखांच्या वडिलांचा अर्धपुतळा सभागृहात बसविण्याचा निर्णय घेतला आहे. सभागृहाचे नूतनीकरण पूर्ण झाल्यानंतर प्रबोधनकारांचा पुतळा बसविण्यात येणार आहे. तत्पूर्वी त्यांचे तैलचित्र सध्याच्या सभागृहात बसविण्याचे आश्वासन प्रशासनाने मनसेला दिले आहे. मनसेच्या प्रयत्नाने शिवसेनाप्रमुखांच्या वडिलांचा अर्धपुतळा सभागृहात बसविण्यात येणार असल्याने शिवसेना नगरसेवकांची पंचाईत झाली आहे. मनसेच्या या मागणीला विरोधही करता येत नाही आणि पाठींबाही देता येत नाही अशी अडचण शिवसेनेपुढे निर्माण झाली आहे. अर्धपुतळ्याच्या बाबतीत ‘करून दाखविणाऱ्या’ मनसेचा विजय झाल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरू आहे.