मध्य रेल्वेच्या दैनंदिन कामकाजात एरवी फारशी महत्त्वाची न मानली जाणारी करीरोड व चिंचपोकळी ही स्थानके गणेशोत्सवाच्या दहा दिवसांत मात्र ओसंडून वाहत असतात. लालबागच्या पट्टय़ातील अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, त्यांच्या गणेशमूर्ती, आरास यांच्याबाबत नेहमीच मुंबईकरांच्या मनात आकर्षण असते. त्यातच ‘लालबागचा राजा’ आणि ‘मुंबईचा राजा’ अशी ओळख असलेला गणेशगल्लीचा गणपती, हे दोन मातबर गणपती याच भागात असल्याने मुंबईकरांचीच नाही, तर राज्यभरातील भाविकांची पावले लालबागच्या गल्ल्यांकडे वळतात. या भागातील सर्वात जुने मंडळ असा लौकीक असलेला गणेशगल्लीचा गणपती हा सर्वार्थाने मुंबईचा राजा आहे.
मंडळाचा इतिहास व वाटचाल
स्वातंत्र्यपूर्व काळात १९२८ च्या दरम्यान गणेशगल्लीतील काही नागरिकांनी एकत्र येत ‘लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळा’ची स्थापना केली आणि या भागातील पहिला सार्वजनिक गणपती बसवला. १९४२ च्या स्वातंत्र्यलढय़ात समाजप्रबोधनाची परंपरा जोपासणाऱ्या या मंडळाने आपल्या गणपतीला नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे रूपा दिले. स्वातंत्र्यदेवीचा रथ घेऊन सुभाषबाबूंच्या रूपात हा गणपती क्रांतीची प्रेरणा घेऊन आला होता. याला एक जवळचा धागाही होता. गणेशगल्लीच्या टोकाला असलेल्या बटाटा मेन्शनमध्ये पहिल्या मजल्यावर सुभाषबाबू काही काळ वास्तव्याला होते.
मुंबईतील पहिल्या भव्य मूर्तीचा मान
मंडळाला ५० वष्रे पूर्ण झाली त्या वर्षी मंडळाने खास दीनानाथ वेलिंग या ख्यातनाम मूर्तीकाराला बोलावून त्यांच्याकडून संपूर्ण प्लास्टर ऑफ पॅरिसमधील मूर्ती घडवली. ही मूर्ती २२ फूट उंच होती. त्या वेळी मुंबईतील या सर्वात भव्य मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी झुंबड उडाली होती. तेव्हापासून आतापर्यंत या मंडळाने भव्यतेची परंपरा आणि संस्कृतीची जोपासना हे आपले ब्रीदवाक्य जपले आहे.
यंदा काय नवीन?
गेल्या दहा वर्षांपासून मंडळाने देशभरातील तीर्थस्थानांचा देखावा उभा करण्यास सुरुवात केली आहे. याला अपवाद २००५ या वर्षांचा. त्या वर्षी मुंबईत आलेल्या मुसळधार पावसाने झालेल्या अपरिमित हानीची दखल घेत मंडळाने उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा केला. गणेशोत्सवात जमा झालेला निधी पुरग्रस्तांच्या मदतीसाठी दान करण्यात आला. यंदा मंडळाने सोमनाथ मंदिराची प्रतिकृती उभारली आहे. त्याचप्रमाणे उत्तराखंड पुरात सर्वस्व गमावलेल्यांना आदरांजली म्हणून एक स्तंभ उभारला आहे. तेथेच एक दानपेटी ठेवण्यात आली असून त्यात जमा होणारा निधी उत्तराखंड रिलीफ फंडासाठी देण्यात येणार आहे.
सामाजिक भान
लालबागमधील या सर्वात जुन्या मंडळाने भव्यतेची परंपरा सांभाळताना सामाजिक भानही जपले आहे. वर्षभर मंडळातर्फे विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येतात. यात रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर, ग्रामीण आरोग्य शिबीर, नेत्रचिकित्सा शिबीर असे विविध उपक्रम राबवले जातात. त्याशिवाय यंदा पडलेल्या दुष्काळाला मदत म्हणून मंडळाने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दोन लाख रुपयांचा निधी दिला. पुढील वर्षांपर्यंत मंडळ स्वत: ची पॅथॉलॉजी लॅब उघडणार आहे. येथे गरीब व गरजू लोकांच्या चाचण्या मोफत करण्यात येतील, असे मंडळाचे अध्यक्ष पराग कदम यांनी सांगितले.