न्यूयॉर्क, लंडन सोडून निघाले बंगलोर, म्हैसूरला!
मुंबईइतकी लोकसंख्या देशात अन्य कोणत्याही शहरात नाही. मुंबईत प्रतिचौरस कि.मी. क्षेत्रफळात राहणाऱ्या लोकांच्या संख्येच्या तर जवळपाससुद्धा देशातील अन्य कोणतेही शहर येत नाही. मुंबईतील झोपडपट्टय़ा, मलनि:सारण प्रकल्प, घनकचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा, रस्ते, उद्याने आदी सगळ्या गोष्टी संपूर्ण देशात ‘एकमेवाद्वितीय’ आहेत. मुंबईची तुलना करायचीच झाली तर वास्तविक न्यूयॉर्क, लंडन, टोकियो, बीजिंग गेलाबाजार सिंगापूर अशा शहरांशी होऊ शकते. असे असूनही मुंबईची घोर चिंता लागलेले नगरसेवक उपरोक्त सोयीसुविधा अधिक चांगल्या तऱ्हेने अन्यत्र कुठे राबविल्या गेल्या आहेत याची पाहणी करण्यासाठी परदेशांमध्ये नव्हे तर ‘देशी’ म्हैसूर, बंगळुरु आदी ‘गावां’ना चालले आहेत. काय म्हणायचे या कर्मदरिद्रीपणाला! एका मुंबईत १० म्हैसूर मावतील तर बंगळुरुसुद्धा मुंबईच्या जेमतेम निम्मे भरेल एवढेच आहे. पण हे ‘कार्यसम्राट’ मुंबईकर त्याची तमा न बाळगता मुंबईसाठी आणखी कायकाय चांगले करता येईल याची पाहणी करण्यासाठी या गावांना निघाले आहेत. आता योगायोगाने मुंबईतील तापमान वाढले आहे आणि या दोन गावांची हवा थंड आहे ही गोष्ट विचारात घेऊ नका! भाजप सरकारने गुजरातमध्ये केलेल्या केलेल्या विकास कामांची पाहणी करण्यासाठी सुधार समितीचे सदस्य सध्या गुजरातेत आहेत. (गुजरातमधील मंडळी अनेक गोष्टींच्या अभ्यासासाठी मुंबई, महाराष्ट्रात येऊन जातात ते सोडा!) तर आता शहर आणि उपनगरे स्थापत्य समित्यांच्या नगरसेवकांनी म्हैसूर आणि बंगळुरुची तिकिटे बुक केली आहेत. बंगळुरु आणि म्हैसूरमध्ये राबविण्यात आलेली घनकचरा व्यवस्थापन योजना, रस्ते व पदपथांची बांधणी, रस्त्यांवरील स्वच्छता, उद्याने व वाहतूक बेटांची देखभाल-सुशोभीकरण, दत्तक वस्ती योजना, गलिच्छ वस्त्यांचे नियोजन आदींचा अभ्यास करण्याची तीव्र इच्छा स्थापत्य समित्यांच्या सदस्यांना झाली आहे. त्यासाठी बंगळुरु आणि म्हैसूरला प्रत्यक्ष जाऊन येणे आवश्यक आणि निकडीचे असल्याचे म्हणणे स्थापत्य समित्यांमध्ये सदस्यांनी मांडले. पुन्हा या दौऱ्यासाठी (अवघा) पाच लाख रुपये खर्च येणार आहे. स्थापत्य समिती (शहरे)चे अध्यक्ष सेल्वन आर. तमिल आणि स्थापत्य समिती (उपनगरे) रमेश कोरगावकर यांनी या दौऱ्याला परवानगी मिळावी यासाठी महापौर सुनील प्रभू यांना करण्यात आली आहे.
त्यात तामिळनाडूमध्ये एका व्यक्तीने १२ एकर जमिनीवर विविध जातींच्या झाडांची लागवड केली आहे. मुंबईत उद्याने आणि बागा फुलविण्याची तीव्र इच्छा असलेल्या बाजार आणि उद्यान समिती सदस्यांनीही मग आम्हीही तामिळनाडूला जाऊन येतो, अशी विनंती केली आहे.
स्थापत्य समित्यांच्या अभ्यास दौऱ्याचा प्रस्ताव गटनेत्यांच्या मंगळवारच्या बैठकीत मांडण्यात येणार होता. परंतु ही बैठक रद्द झाली. मात्र गटनेत्यांच्या पुढील बैठकीत या अभ्यास दौऱ्यांना परवानगी मिळण्याची शक्यता आहे.