यांनी तारले
* डबेवाले
* खाऊगल्ल्या
* रस्त्यावरील खाद्यपदार्थाच्या गाडय़ा आणि ठेले
* रेल्वे परिसरातील फूड मॉल
* पोळीभाजी केंद्र

आपल्या व्यवस्थापनशास्त्राची भलाभल्यांना मोहिनी घालणाऱ्या डबेवाल्यांनी पुन्हा एकदा आपण चाकरमान्यांचे खरेखुरे ‘अन्नदाते’ असल्याची ग्वाहीच ‘हॉटेल बंद’च्या निमित्ताने सोमवारी दिली.
मुंबईतले सर्व डबेवाले २२ ते २८ एप्रिल या काळात खंडोबाच्या जत्रेला गेले होते. सोमवारी ते या दीर्घ रजेवरून पुन्हा कामावर रुजू झाले. नेमका आजच हॉटेलचालकांनी बंद पुकारून आपल्या चुली थंड ठेवल्या. या बंदमुळे दुपारी क्षुधातृप्तीसाठी पूर्णपणे हॉटेल किंवा रेस्तराँवर अवलंबून राहणाऱ्या लाखों चाकरमान्यांची चांगलीच गैरसोय झाली. मधल्या सुट्टीत नेहमीच हॉटेलांचा मार्ग अवलंबणाऱ्यांना बंदमुळे वाट वाकडी करत खाऊ गल्ल्या किंवा रस्त्यावरील गाडय़ा किंवा ठेल्यांकडे मोर्चा वळवावा लागला. एरवी यात नियमितपणे घरून डबे आणणारे चाकरमानीही सापडले असते. पण, आजच नेमके डबेवाले कामावर रुजू झाल्याने दुपारच्या जेवणासाठी घरच्या जेवणावर अवलंबून असलेल्या सुमारे दोन लाख मुंबईकरांची ‘हॉटेल बंद’ने होऊ घातलेली संभाव्य गैरसोय टळली.
‘नूतन टिफिन बॉक्स सप्लायर असोसिएशन’च्या मार्फत डबेवाले तब्बल दोन लाख मुंबईकरांना दररोज घरच्या वा खाणावळीच्या जेवणाचा डबा त्यांच्या कार्यालयापर्यंत पोहोचवितात. म्हणूनच त्यांना ‘चाकरमान्यांचे अन्नदाते’ म्हटले जाते. वर्षभरात एकदाच ते खंडोबाच्या यात्रेकरिता कामातून तात्पुरती रजा घेतात. त्यांची सुट्टी रविवारी संपली. ‘कामावर रुजू होण्यास एक दिवस जरी विलंब लागला असता तर तब्बल दोन लाख मुंबईकरांची घरच्या जेवणाच्या डब्याविना मोठी कठीण परिस्थिती झाली असती,’ असे संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ मेदगे यांनी मान्य केले. त्यामुळे, दररोज कामधंद्यानिमित्त बाहेर पडणाऱ्या मुंबईकरांना सोमवारी डबेवाल्यांच्या रूपाने खंडोबाच पावला, असे म्हणायला हवे.
सेवा कराला विरोध करण्यासाठी मुंबईसह राज्यभरातील हॉटेलचालकांनी सोमवारी बंद पाळला. त्यामुळे, चर्चगेटमधील फूड मॉलमध्येही त्यामुळे चांगलीच गर्दी झाली होती. खाऊ गल्ल्या या बंदपासून लांब असल्याने भुकेल्या मुंबईकरांना त्यांचा चांगलाच आधार मिळाला. रस्त्याच्या कडेला भाजीपोळी, पुलाव विकणाऱ्यांनीही आज चांगलेच                       तारले.