वडिलोपार्जित व्यवस्थापन प्रणाली वापरून मुंबईतील नोकरदारांना या त्यांच्या घरचा जेवणाचा डबा कार्यालयापर्यंत पोहचविणारे डबेवालेदेखील आता ‘ऑनलाइन’ होणार आहेत.
मुंबईत गेली १२५ वर्षे डबेवाले आपली सेवा देत आहेत. यात आधुनिक तंत्राचा वापर शून्य आहे. त्यात काळानुरूप काही बदल झाले तेवढेच. केवळ कित्येक वर्षांच्या सरावाने डबे पोहचविण्याचे अनोखे तंत्र डबेवाल्यांनी विकसित केले आहे. लाखो मुंबईकरांचे जेवणाचे डबे रोजच्या रोज पोहचवूनदेखील याचा डबा त्याला आणि त्याचा याला, असे डबेवाल्यांच्या बाबतीत क्वचितच घडते. म्हणून त्यांच्या व्यवस्थापनकौशल्याची दखल जगभरात घेतली गेली. आता डबेवाल्यांनी आधुनिक तंत्राचीही कास धरून आपली सेवा अधिक ग्राहकाभिमुख करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ते आता ‘ऑनलाइन’ होणार आहेत.
मुंबईत चार ते साडेचार हजार डबेवाले डबे पोहोचविण्याचे काम करतात. त्यांची माहिती ऑनलाइन उपलब्ध होणार आहे. म्हणजे ग्राहकांना आपापल्या विभागातील डबेवाल्यांशी संपर्क साधून सेवा मिळविता येईल. तसेच, डबे पोहोचविण्याच्या कामातही या माहितीची उपयोग केला जाणार आहे, असे ‘मुंबई डबेवाला संघटने’चे सरचिटणीस सुभाष तळेकर यांनी सांगितले.
त्यासाठी  dabewale.com हे संकेतस्थळ सुरू करण्यात येणार आहे. सोमवारी आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर ही ऑनलाइन सेवा सुरू केली जाईल. ‘अनेक सेवा कंपन्या ऑनलाइन सेवा उपलब्ध करून देऊन आपल्या ग्राहकांना दर्जेदार सेवा देण्याचा प्रयत्न करीत आहेत. मुंबईचे डबेवाले ऑनलाइन सेवेतही मागे नाही हे जगाला दाखवून देण्याचा आमचा प्रयत्न राहील,’ असे तळेकर यांनी सांगितले.
ज्या ग्राहकांना डब्याची सेवा हवी असेल त्यांनी डबेवाल्यांच्या संकेतस्थळाला भेट देऊन आपल्या स्टेशनला, गल्लीत, विभागात, इमारतीत कोणता डबेवाला येतो याची माहिती मिळविता येईल. या डबेवाल्याचा संपर्क क्रमांक त्यांना या संकेतस्थळावरून मिळविता येईल. तसेच, ग्राहकांची माहितीही या संकेतस्थळावर जमा केली जाईल. हा प्रयोग यशस्वी झाल्यास डबेवालेही ऑनलाइन कसे राहतील, यासाठी प्रयत्न केला जाणार आहे, असे तळेकर यांनी सांगितले.