News Flash

मुंबईची नालेसफाई – वरवरची मलमपट्टी

मुंबई २६ जुलै, २००५ ला पाण्याखाली गेली तेव्हा कुठे पावसाळापूर्व नालेसफाईच्या कामाकडे गांभीर्याने पाहिले जाऊ लागले.

| June 9, 2015 06:14 am

मुंबई २६ जुलै, २००५ ला पाण्याखाली गेली तेव्हा कुठे पावसाळापूर्व नालेसफाईच्या कामाकडे गांभीर्याने पाहिले जाऊ लागले. नालेसफाईची कामे पावसाळ्यापूर्वी केली जाणे अपेक्षित आहे. गाजावाजा करून ही कामे केल्याचे दावेही पालिकेकडून दरवर्षी केले जातात. या वर्षीही ३१ मे रोजी पावसाळापूर्व नालेसफाईच्या कामांना पूर्णविराम मिळाल्याचे पालिकेने जाहीर केले. पण, ‘लोकसत्ता’ने पालिकेच्या नालेसफाईच्या कामाचा आढावा घेतला असता आजच्या घडीलाही मुंबईतील अनेक नाले कचऱ्याने तुडुंब भरले असल्याचे आढळून आले. नाल्याच्या परिसरात फोफावलेली अनधिकृत बांधकामे, नाल्याच्या पात्रात करण्यात आलेले अशास्त्रीय बदल, टाकण्यात आलेले भराव, नालेसफाईच्या कामात होणारा भ्रष्टाचार यांमुळे पावसाळापूर्व नालेसफाई वरवरची मलमपट्टी ठरते आहे. घरातील केरकचरा, उष्टीखरकटी, नको असलेल्या वस्तू थेट नाल्यात भिरकावले जातात. मुंबईमधील नद्यांचीही परिस्थिती नाल्यांसारखीच झाली आहे. किनाऱ्यावरील कारखाने, सोसायटय़ा आणि वस्त्यांमधून सर्रास सोडण्यात येणारे सांडपाणी, मलजलामुळे नद्या गटारगंगा बनल्या आहेत. त्यामुळे केवळ पावसाळ्यापूर्वी नव्हे, तर वर्षभर नाल्यांची व नद्यांची सफाई करणे आवश्यक आहे. काही ठिकाणी काठावरच टाकण्यात आलेला कचरा-गाळ पावसाच्या पाण्याबरोबर नाल्यात जाण्याची शक्यता आहे, तर काही ठिकाणी अरुंद असलेल्या नद्यांची स्थिती गंभीर आहे. यामुळे यंदाही सखलभाग जलमय होण्याचीच अधिक भीती आहे.

पोयसर नदी
पश्चिम द्रुतगती महामार्गावरील कांदिवली येथून वळणे घेत विविध वस्त्यांमधून धावणाऱ्या पोयसर नदीला नाल्याचे रूप आले आहे. पालिकेने नदीच्या मोक्याच्या ठिकाणी स्वच्छता केली आहे. पण आसपासच्या परिसरातून नदीला येऊन मिळणारे नाले कचरा आणि गाळातच अडकले आहेत. गावदेवी रोड, बिहारी टेकडी रोड या ठिकाणी मोठय़ा प्रमाणावर झोपडपट्टी उभी आहे. या झोपडपट्टय़ांमधून जाणाऱ्या नाल्याच्या दोन्ही बाजूला संरक्षक भिंत उभारण्याचे काम दोन-तीन महिन्यांपूर्वीच पालिकेने पूर्ण केले. त्यामुळे या भागातील झोपडपट्टीवासीयांना दिलासा मिळेल असा दावा पालिका अधिकारी करीत आहेत. परंतु या नाल्याची सफाई अजिबात करण्यात आलेली नाही. एका ठिकाणी नाला रेल्वे मार्गाखालून पुढे सरकतो. पण कचरा आणि मातीच्या ढिगाऱ्यामुळे नाल्याची वाट बंद झाली आहे. परिणामी पाण्याचा प्रवाह बंद होऊन हा परिसर पाण्याखाली जाण्याची भीती आहे. सध्या या वस्त्यांमध्ये प्रचंड दरुगधी पसरली असून अधूनमधून आरोग्याचे प्रश्नही निर्माण होत आहेत. नाल्याची सफाईच करण्यात न आल्यामुळे पावसाळ्यात संरक्षक भिंतीलाही धोका निर्माण होऊ शकतो. पूर्वी पूरस्थिती निर्माण झाल्यावर घरात पाणी येण्याची भीती होती. आता संरक्षक भिंत पडली तर जीवित हानी होण्याची टांगती तलवार नाल्यालगतच्या घरांतील रहिवाशांच्या डोक्यावर आहे. पोयसर नदी पुढे डहाणुकरवाडी, लालजीपाडय़ातून खाडीला मिळते. या परिसरातील पावसाचे पाणी पोयसर नदीतून खाडीत जाते. पण ज्या ठिकाणी नदी खाडीत विलीन होते तेथे पूर्वी दलदल होती. त्यावर आता मातीचा भराव करण्यात आला आहे. त्यामुळे नदीतील पाण्याचा निचरा झटपट होण्यात अडथळा निर्माण होण्याची भीती रहिवाशांकडून व्यक्त होत आहे. लालजीपाडय़ातील नदीलगतचा नालाही कचऱ्याने भरला आहे. परिणामी पोयसर नदीच्या काठावरील झोपडपट्टय़ांना यंदाही पूरस्थितीचा सामना करावा लागण्याची चिन्हे आहेत.

दहिसर नदी
बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून खळखळत बाहेर पडणाऱ्या दहिसर नदीच्या पात्राचे रुंदीकरण आणि खोलीकरणाचे काम पालिकेने पूर्ण केले आहे. तसेच नदी काठावर संरक्षक भिंतही उभारली आहे. पण पूर्व-पश्चिमेला जोडणारा पूल आणि रेल्वे मार्गाखालून जाणारी दहिसर नदीच्या पात्राचे रुंदीकरण होऊ शकलेले नाही. परिणामी रेल्वे मार्गालगतच्या वस्त्या आणि आंबावाडी, दौलतनगर भागातील रहिवाशांना यंदा पूरस्थितीचा सामना करण्याची वेळ येणार आहे. एस. व्ही. रोडवरील आंबावाडी-दौलतनगर येथे पुलाखाली आजही प्रचंड गाळ आणि कचरा साचला आहे. काही दिवसांपूर्वी पालिकेने नेमलेल्या कंत्राटदाराने नदीच्या या भागात सफाई केली. पण कचरा आणि गाळ पूर्णपणे काढलेला नाही. दहिसर नदीमध्ये सोडले जाणारे सांडपाणी, गोठय़ांमधील शेणमिश्रित पाण्याचा बंदोबस्त करणे पालिकेला अद्यापही जमलेले नाही. त्यामुळे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाबाहेर पडताच श्रीकृष्ण कॉम्प्लेक्सच्या खालून गोठय़ातील शेणमिश्रित पाणी नदीत सोडले जात असून इथूनच नदीच्या प्रदूषणाला सुरुवात होते. पुढे झोपडपट्टय़ा आणि काही सोसायटय़ांचे सांडपाणीही नदीतच सोडले जात आहे. एस. व्ही. रोडवरील स्मशानभूमीजवळच्या झोपडपट्टीतून नदीमध्ये सर्रास कचरा भिरकविण्यात येत आहे. त्यामुळे रुंदीकरण झाल्यानंतरही नदीमध्ये कचऱ्याचे साम्राज्य वाढतच आहे. हा कचरा पालिकेला डोकेदुखी बनू लागला आहे. सुमारे १५ दिवसांपूर्वी पुलाखाली नदीची सफाई करण्यात आली. आठ-दहा ट्रक भरून कचरा नेण्यात आला. पण साफसफाईचे काम अर्धवटच करण्यात आले. गेल्या वर्षीप्रमाणे यंदा साफसफाईचे काम करण्यात आलेले नाही. त्यातच आसपासच्या झोपडपट्टय़ांमधून दररोज प्रचंड कचरा नदीतच फेकण्यात येतो. कचरा वाढतच असल्याने यंदा या भागात पाणी साचण्याची भीती येथील दुकानदार इम्रान याने व्यक्त केली.

मोगरा नाला
अंधेरी परिसरातून धावणाऱ्या मोगरा नाल्याची अवस्था अत्यंत बिकट बनली आहे. उपनगरवासीयांच्या सुविधेसाठी न्यू लिंक रोडवर अंधेरी येथे आरटीओ कार्यालय उभारण्यात आले आहे. या कार्यालयाजवळूनच मोगरा नाला पुढे जात होता. परंतु नाल्यालगत विकासकाने एक मोठी इमारत उभी केली असून पुढेही विकास कामे सुरू आहेत. विकासाला अडसर ठरलेल्या मोगरा नाल्यावरच सिमेंट काँक्रीटचा स्लॅब उभारून तो बंद केला आहे. या स्लॅबखाली नाल्यात प्रचंड कचरा साचला आहे. स्लॅबमुळे कचरा काढणे अशक्य बनले आहे. कचरा काढण्यात आला नाही, तर या परिसर जलमय होण्याचा धोका आहे. काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी या नाल्यात साचलेल्या कचऱ्याबाबत आवाज उठविला होता. त्यानंतर नाल्याचा काही भाग सफाई कामगारांद्वारे सफाईचा फार्स करण्यात आला. परंतु पुढे विकास सुरू असलेल्या जागेतील नाल्याची परिस्थिती आजही गंभीरच आहे. सफाई न झाल्यामुळे अंधेरीमधील हा परिसर मुसळधार पावसात पाण्याखाली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मालवणी गेट क्र. ५ – ६
मालाडच्या मालवणी परिसरातील गेट क्रमांक ५ आणि ६ च्या दरम्यान प्रचंड मोठी झोपडपट्टी उभी राहिली आहे. तेथे अनेक कारखानेही आहेत. झोपडपट्टीवासीय आणि कारखानदारांमुळे या नाल्याला कचराकुंडीचे रूप आले आहे. दरुगधी आणि साथीच्या आजारांमुळे येथील रहिवाशी त्रस्त आहेत. या नाल्यामध्ये प्रचंड कचरा आणि गाळ साचला आहे. आसपासच्या परिसरातील पावसाचे पाणी वाहून नेणारा हा नाला पुढे श्रीलंका नामक वस्तीतून जातो. परंतु गेट क्र. ५-६ दरम्यान नाला कचऱ्याने खच्चून भरला आहे. त्यामुळे यंदा पावसात नाल्यालगतच्या झोपडय़ा जलमय होण्याची चिन्हे आहेत. काही दिवसांपूर्वी पालिकेच्या कंत्राटदाराने कचरा-गाळ उपसण्यासाठी एक पोकलेन नाल्यालगत उभा केला. दिवसातून केवळ अर्धातास पोकलेनद्वारे कचरा-गाळ उपसण्याचे काम सुरू होते. त्यानंतर दिवसभर पोकलेन उभाच असतो. काही दिवसांपूर्वी पालिका अधिकाऱ्यांनी या नाल्याची पाहणी करून साफसफाई करण्याची सूचना कंत्राटदाराला दिली होती. परंतु त्यानंतरही परिस्थिती ‘जैसे थे’ आहे, असा आरोप या भागातील रहिवाशांकडून करण्यात आला.     

गझदरबंद नाला
मुसळधार पाऊस कोसळताच अक्राळविक्राळ रूप घेत आसपासच्या झोपडपट्टय़ा जलमय करणारा नाला म्हणून सांताक्रूझचा गझदरबंद नाला प्रसिद्ध आहे. सांताक्रूझच्या गझदरबंद रोडवर प्रचंड मोठी झोपडपट्टी असून तिच्या एका बाजूला हा नाला आहे. झोपडपट्टय़ांसाठी हा नाला कचराकुंडी बनला आहे. त्यामुळे हा नाला कचऱ्याने तुडुंब भरलेला आहे. पावसाळा जवळ येताच पालिका कंत्राटदारामार्फत या नाल्याच्या सफाईचे काम हाती घेते. दरवर्षीप्रमाणे वरवरचा कचरा उपसून नाल्याच्या एका बाजूच्या मोकळ्या भूखंडावर टाकण्यात आला आहे. हा कचरा पावसाच्या पाण्यासोबत पुन्हा नाल्यात जाण्याची शक्यता आहे. लगतच्या झोपडय़ांमधून नाल्यात कचरा टाकण्याचे थांबलेले नाही. त्यामुळे सफाई करूनही पुन्हा नाला कचऱ्याने भरू लागला आहे. झोपडपट्टीवासीयांना त्रास होऊ नये म्हणून गेल्या काही महिन्यापूर्वी नाल्याच्या दोन्ही बाजूला संरक्षक भिंत उभारण्यात आली आहे. त्यामुळे यंदा झोपडीत पाणी येणार नाही अशी पालिकेला अपेक्षा आहे. पण नाल्यात फेकल्या जाणाऱ्या कचऱ्याचा बंदोबस्त करण्यात पालिका अपयशी ठरली आहे. त्यासाठी जनजागृतीची गरज आहे.
गोबर नाला
गेली अनेक वर्षे विलेपार्ले येथील मीलन सब वेजवळच्या गोठय़ांमधून नाल्यातच मोठय़ा प्रमाणावर शेणमिश्रित पाणी सोडण्यात येत आहे. मीलन सब वे पाण्याखाली जाण्यास कारणीभूत असलेला हा नाला गोबर नाला या नावानेच परिचित झाला आहे. कितीही सफाई केली तरी गोठय़ामधील शेणमिश्रित पाण्यामुळे हा नाला अस्वच्छ असतो. यंदा पालिकेने अमल सबवे रोडलगत सफाई करून पालिकेने हा नाला लख्ख केला. सुकलेले शेण आणि कचरा उपसून त्याची विल्हेवाटही लावली. मात्र वळण घेऊन मैदान आणि वस्त्याच्यामधून पुढे गेलेल्या या नाल्यात प्रचंड कचरा साचला आहे. मुख्य रस्त्यावरील दृष्टीस पडणाऱ्या भागाची सफाई करून उर्वरित नाला तसाच सोडण्यात आला आहे. या नाल्यामुळे यंदाही सखलभाग जलमय होऊन परिसरातील रहिवाशांना फटका बसण्याची चिन्हे आहेत.
चमडावाला नाला
वांद्रे टर्मिनससमोर जलवाहिनीवर आणि त्याच्या आसपास वसलेल्या इंदिरा गांधी नगरातून चमडावाला नाला जातो. नाल्याशेजारीच असलेल्या मोठय़ा जलवाहिनीवर दोन्ही बाजूने दुमजली, तीन मजली झोपडय़ा उभ्या राहिल्या आहेत. या झोपडपट्टीतून टाकण्यात येणाऱ्या कचऱ्यामुळे नालाच नव्हे तर आसपासचा परिसरही बकाल झाला आहे. दरुगधी आणि आरोग्याचे प्रश्न इथल्या नागरिकांच्या अंगवळणी पडले आहेत. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी पालिका या नाल्याची सफाई करते. यंदाही पालिकेच्या कंत्राटदाराने हा नाला साफ केला. मात्र आजघडीला नाल्यामध्ये प्रचंड कचरा साचला आहे. झोपडपट्टीतून सातत्याने कचरा टाकण्यात येत असल्यामुळे कितीही सफाई केली तरी हा नाला पुन्हा कचऱ्याने भरतो असे पालिका अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. यंदा पालिकेने नाल्याची वरवर सफाई केली. नाल्याच्या तळाशी साचलेला गाळ काढलाच नाही, असा आरोप रहिवाशी करीत आहेत. पालिका अधिकारी आणि झोपडपट्टीवासी एकमेकावर आरोप करीत असले तरी यंदा मुसळधार पाऊस पडताच रहिवासांना पूरस्थितीचा सामना करावा लागण्याची चिन्हे आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2015 6:14 am

Web Title: mumbai drainage cleaning
टॅग : Drainage
Next Stories
1 संगीतबारीसारख्या कलाप्रकाराला व्यासपीठ
2 गाशा गुंडाळा
3 वाया गेलेल्या अनारक्षित तिकिटांच्या पशांसाठीची वणवण थांबवा!
Just Now!
X