अठराव्या शतकात कपडे शिवणाऱ्यांची जागा कपडय़ांमधील बारकावे हेरून त्यांना बदलत्या काळाप्रमाणे बदलणाऱ्या फॅशन डिझायनर्सनी घेतली. तेव्हापासून पॅरिस हे शहर फॅशन क्षेत्राची जन्मभूमी म्हणून समोर आले. त्यानंतर काळानुसार विस्तारत गेलेल्या या क्षेत्रात न्यूयॉर्क, लंडन, मिलान ही शहरेही फॅशनची केंद्रे म्हणून नावारूपास आली. ३ मेपासून न्यूयॉर्क येथे होणाऱ्या ‘ग्लोबल फॅशन कॅपिटल’ या प्रदर्शनामध्ये जगभरातील फॅशन क्षेत्रात आतापर्यंत झालेले बदल जगातील नामवंत ७० डिझायनर्सच्या कपडय़ांच्या माध्यमातून दाखवण्यात येणार आहेत. या प्रदर्शनामध्ये नव्याने उदयाला येणाऱ्या फॅशन केंद्रांचा समावेश केला गेला असून त्यामध्ये मुंबईचा समावेशही आहे. या वेळी मुबंईच्या फॅशनचे प्रतिनिधित्व डिझायनर वेंडल रॉड्रिक्स करणार आहे.  
हिंदी चित्रपटसृष्टी, सेलेब्रिटीज यांच्या उदयासोबतच मुंबईतील फॅशन क्षेत्र भारभराटीला येऊ लागले. आजच्या घडीला मुंबई, दिल्ली, बेंगळूरूसारख्या भारतातील इतर शहरांच्या तुलनेत डिझायनर्ससाठी उद्योगासाठी महत्त्वाचे केंद्र ठरू लागले आहे. त्याची दखल अर्थातच जागतिक पातळीवर घेतली जाऊ लागली आहे. अनेक नावाजलेले जागतिक बँड्र आणि डिझायनर्स मुंबईमध्ये गुंतवणुकीसाठी उत्सुक आहेत. त्याच पाश्र्वभूमीवर न्यूयॉर्कच्या ‘फॅशन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’च्या संग्राहलयामध्ये येत्या ३ मेपासून होणाऱ्या प्रदर्शनामध्ये बर्लिन, इस्तांबूल, जोहॅन्सबर्ग यांसारख्या नव्याने विकसित झालेल्या जगभरातील फॅशन केंद्रांमध्ये मुंबईचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये रॉड्रिक्स आणि डिझायनर मनीष अरोरा या दोन भारतीय डिझायनर्सच्या कपडय़ांची निवड करण्यात आली आहे.
रॉड्रिक्सने दिल्लीत नुकत्याच पार पडलेल्या ‘अॅमेझॉन इंडियन फॅशन वीक’मध्ये सादर केलेल्या फुशिया-नारंगी रंगाच्या नेट आणि लायक्रा कापडांपासून बनविलेल्या ‘गाऊन कम स्वीमसूट’ची निवड करण्यात आली आहे. तर मनीषने बॉलीवूड आणि पॅचवर्क पद्धतीचा वापर करून तयार केलेल्या गाऊनची निवड प्रदर्शनासाठी करण्यात आली आहे. मूळचा दिल्लीचा असलेला अरोराचे नाव पॅरिसमध्ये बरेच परिचयाचे आहे. ‘पॅरिस फॅशन वीक’मध्ये नियमितपणे कलेक्शन सादर करण्याची संधी मिळविलेल्या मोजक्या भारतीय डिझायनर्समध्ये मनीषचा समावेश होतो.
कपडय़ांवरील बोल्ड प्रिंट्सच्या वापरासाठी तो ओळखला जातो. तर रॉड्रिक्स हे युथफुल कपडे तयार करण्याच्या शैलीसाठी ओळखले जातात. या प्रदर्शनातील भाग घेता आल्याबद्दल समाधान व्यक्त करत रॉड्रिक्स यांनी या बहुमानामुळे हे कलेक्शन तयार करण्यामागची मेहनत यानिमित्ताने फळाला आल्याचे मत व्यक्त केले. तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली, हे आपल्यासाठी महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी सांगितले.