मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरण प्रकल्पातील पळस्पा ते इंदापूर या पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण होण्यासाठी अजून एक वर्ष उशीर लागण्याची चिन्हे आहेत. भूसंपादन विभागाच्या दिरंगाईमुळे ही वेळ आली आहे. अजूनही पनवेलच्या तारा गावातील शेतकऱ्यांच्या किमतीचा निवाडा जाहीर झालेला नाही.
राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या देखरेखीखाली सध्या ज्या ठिकाणचे भूसंपादन झाले तिथेच काम सुरू आहे. पळस्पा ते इंदापूरदरम्यान कर्नाळा अभयारण्यातील बांधकामाचा तेढ आहे. कर्नाळा अभयारण्यातून दीड किलोमीटर रस्त्याची रुंदी १७ मीटर आहे. केंद्रीय वन विभागाने येथे काम करण्यास परवानगी नाकारल्याने या पट्टय़ातील रस्त्याचे रुंदीकरण २ मीटर करून मार्गात दुभाजक टाकून कर्नाळामधील न सुटणारा गुंता सोडविण्याच्या प्रशासन विचारात असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. कर्नाळा येथील बांधकामास नुकतीच राज्याच्या वन विभागाने मंजुरी दिली आहे. मात्र केंद्रीय पर्यावरण मंत्रालय आणि वन्य जीव विभागाने याबाबतचा प्रस्ताव नामंजूर केला आहे. पुन्हा भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने या दोन्ही प्रशासनांकडे सुधारित प्रस्ताव पाठविल्याचे समजते.
८४ किमीसाठी ९०० कोटी
पळस्पा- इंदापूर हा मार्ग ८४ किलोमीटर अंतराचा आहे. संबंधित कंत्राटदार हे काम ९०० कोटी रुपयांमध्ये करणार असून या मार्गावर २१ वर्षे टोल वसुली होणार आहे. अर्थात त्यामुळे ८४ किलोमीटरचे अंतर अर्धा ते पाऊण तासात पार करता येणार आहे. संथ भूसंपादन प्रक्रियेमुळे या मार्गाचे काम रखडण्याची तसेच किंमत वाढण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. अर्थात जितकी किंमत वाढेल तेवढा टोल वाढणार आहे.  
लोकप्रतिनिधींचा पुढाकार
पळस्पा ते इंदापूर महामार्गाच्या चौपदरीकरणादरम्यान उद्योगमंत्री नारायण राणे, जलसंपदा मंत्री सुनील तटकरे, माजी मंत्री रवी पाटील, स्थानिक आमदारांची घरे, फार्म हाऊस आहेत. या मंत्रिमहोदयांनी यावेळी विकासाला साथ देत जे शेतकऱ्यांचे होईल तेच आपल्याही बांधकामाचे करा, असा पवित्रा घेतल्याचे समजते. रायगडचे पालकमंत्री तटकरे यांनी नुकत्याच झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ‘पहिले माझे घर पाडा नंतरच काम सुरू करा’ असा पवित्रा घेतल्याने राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणातील अधिकाऱ्यांचे मनोबलही स्फुरले आहे.