उपनगरी रेल्वेसेवा ही मुंबईकरांची ‘लाइफ लाइन’ अर्थात जीवनवाहिनी समजली जाते. ती फारशी सुरक्षित नाही हे सत्य प्रवाशांना चांगलेच माहीत आहे. त्यामुळे या जीवनवाहिनीतून प्रवास करताना जमेल तेवढी काळजीही ते घेतात. प्रवास सुरक्षित करण्याची मुख्य जबाबदारी वास्तविक रेल्वेची आहे. परंतु ते सोडून रेल्वेने आता या जीवनवाहिनीतून प्रवास करणाऱ्यांची ‘गाठ यमाशी’ पडेल याची काळजी घेतली आहे. लोकलमधून पडून होत असलेले अपघात टाळण्यासाठी पश्चिम रेल्वेने थेट मृत्यूच्या दूताकडून संदेश देण्याचे ठरवले आहे. मात्र अपघात टाळण्यासाठी रेल्वेकडून ठोस उपाययोजनेची अपेक्षा असताना अशी नकारात्मक भावना पसरवणाऱ्या जाहिरातींना प्रवासी व मानसोपचार तज्ज्ञांनी विरोध केला आहे.
वाढती गर्दी, नवीन लोकल व फलाटांमधील पोकळी यावर रेल्वे प्रशासनाकडून उपाययोजना होण्याची अपेक्षा प्रवासी करत होते. मात्र त्याऐवजी पश्चिम रेल्वेने यमाच्या माध्यमातून लोकांना लोकलप्रवासातील धोके सांगण्यास सुरुवात केली आहे. गुरुवारपासून चर्चगेट रेल्वेस्थानकावर सुरू होत असलेल्या या मोहिमेमुळे सुरक्षित प्रवास करण्यावर भर देणाऱ्या प्रवाशांनाही सकाळी सकाळी यमाचे दर्शन घ्यावे लागणार आहे. ही जाहिरात म्हणजे जखमेवर मीठ चोळण्यासारखे असल्याची संतप्त प्रतिक्रिया प्रवाशांकडून व्यक्त होत आहे. मानसोपचारतज्ज्ञांनीही अशा प्रकारची जाहिरात अनावश्यक असल्याचे सांगितले.
भीती दाखवून कोणतेही शिक्षण होत नाही. त्यासाठी प्रेरणा देणे आवश्यक असते. सिगारेटच्या पाकिटावर कवटी आणि हाडे दाखवल्याने धूम्रपान कमी झालेले नाही. प्रवाशांना यमाची भीती दोन दिवस वाटेल. तिसऱ्या दिवशी ते त्याला ढकलून लोकल पकडायला धावतील. शिवाय यम ही फक्त हिंदूंशी संबंधित संकल्पना आहे. सकाळच्या गडबडीत लोकांपर्यंत ती पोहोचण्याचीही शक्यता नाही. त्याऐवजी लोकांना भावनिक आवाहन केल्यास अधिक चांगला संदेश देता येईल, असे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. हरीश शेट्टी म्हणाले.
प्रवाशांची जनजागृती करण्यासाठी मध्य रेल्वेच्या विविध स्थानकांवर आम्ही गेल्या दोन वर्षांपासून सुरक्षा जागृती अभियान करत आहोत. मात्र त्यातून फारसे प्रबोधन होत नसल्याचे लक्षात आले आहे, असे प्रवासी महासंघाचे नंदकुमार देशमुख म्हणाले. रेल्वे मंत्र्यांनी ७२ रेल्वे फलाटांची उंची पुढील तीन वर्षांत वाढवली जाईल असे सांगितले. म्हणजे आणखी तीन वर्षे फलाटांमधील फटीमुळे अपघात घडणार. ही तांत्रिक समस्या युद्धपातळीवर सोडवण्याऐवजी यम आणण्यासारखी जाहिरात करणे म्हणजे प्रवाशांच्या भावनांशी खेळ करण्यासारखेच आहे, अशा शब्दांत त्यांनी रेल्वेच्या जाहिरातीची खिल्ली उडवली.
यमासारख्या मृत्यूच्या देवतेकडून प्रवाशांना संदेश देण्याची रेल्वेची योजना अशोभनीय व संकुचित विचारांची आहे. याने प्रवासी घाबरण्याचीच शक्यता आहे. देव, राक्षस अशा काल्पनिक संकल्पनांच्या आधारे घाबरवून टाकण्यापेक्षा थेट उपाययोजना करावी, असा सल्ला रेल प्रवासीचे अध्यक्ष मधु कोटीयन यांनी दिला आहे.
जाहिरात मोहीम
यमाचे कटआऊट तसेच भित्तीचित्रांसोबत धोक्याची सूचना लिहिली जाईल. धावत लोकल पकडणे, रुळ ओलांडणे हे यमासोबत जाण्यासारखेच असल्याचा संदेश यामार्फत देण्यात येईल. ही मोहीम अधिक प्रभावी करण्यासाठी यमाच्या वेशभूषेतील कलाकार रेल्वेस्थानकावर असेल. गुरुवारपासून चर्चगेट स्थानकावर हा मोहिमेचा आरंभ होत असून नंतर ती इतर स्थानकांवरही राबवण्यात येईल.
यापूर्वीचा प्रयोग
रुळ ओलांडताना होणारे मृत्यू टाळण्यासाठी यापूर्वी पश्चिम व नंतर मध्य रेल्वेने लोकलखाली येत असलेल्या माणसाचे फोटो सर्वत्र लावले होते. लोकल अंगावर येत असताना माणसाच्या चेहऱ्यावरील भेदरलेले भाव पाहून प्रवासी रुळ ओलांडणार नाही, अशी रेल्वेची अटकळ होती. मात्र ही जाहिरात लावून पाच वर्षे उलटल्यावरही रुळ ओलांडताना होणाऱ्या अपघातांची संख्या कमी झालेली नाही, उलट या संख्येत वाढ झाली आहे.