मुंबई मराठी साहित्य संघाचे नाटय़सेवा गौरव पुरस्कार जाहीर झाले आहेत. साहित्य संघाचे आद्य संस्थापक डॉ. अ. ना. भालेराव यांच्या स्मृतिदिनानिमित्त २५ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात या पुरस्करांचे वितरण केले जाणार आहे. रोख रक्कम आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. गिरगाव येथील साहित्य संघाच्या डॉ. भालेराव सभागृहात सायंकाळी सहा वाजता होणाऱ्या या सोहळ्यास ज्येष्ठ साहित्यिक व संघाचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. पुरस्कार सोहळ्यानंतर वैनतेय तुळजापूरकर लिखित व यश कदम दिग्दर्शित ‘शूरा मी वंदिले’ या नाटकाचा प्रयोग सादर होणार आहे.
नाटय़सेवा गौरव पुरस्कार पुढीलप्रमाणे :
संगीत नाटकातील गायक कलाकार पुरस्कार-संजीव मेहेंदळे, संगीत नाटकातील गायिका कलाकार पुरस्कार-भक्ती खांडेकर, निर्माता संस्था पुरस्कार-श्री भवानी प्रॉडक्शन, प्रायोगिक रंगभूमी संस्था पुरस्कार-अमर हिंद मंडळ, राज्य नाटय़ स्पर्धा, संगीत नाटक-प्रथम क्रमांक मिळालेली संस्था- राधाकृष्ण कलामंच (रत्नागिरी), विनोदी नाटय़लेखन पुरस्कार-मिहिर राजदा (गोष्ट तशी गमतीची), सवरेत्कृष्ट स्त्री अभिनेत्री पुरस्कार-रोहिणी हट्टंगडी, स्त्री नृत्य कलावंत पुरस्कार-जयमाला इनामदार, गद्य नाटय़ कलावंत (पुरुष) पुरस्कार-अतुल परचुरे, संगीत नाटय़विषयक काम करणारी संस्था-आदित्य थिएटर्स, फोंडा (गोवा).