काही ठकसेन आपल्या कारनामे सहज पचवून जातात. परतुं कधी कधी त्यांची क्षुल्लक चूकही त्यांना अडकवू शकते. एका बांगलादेशी नागरिकाने भारतात येऊन मुंबईत आपला जम बसवला. पण केवळ मराठीत अतिहुशारी दाखवल्याने पोलिसांच्या जाळ्यात अडकला.
सुमित्रा चक्रवर्ती (३८) हा बांगलादेशी नागरिक. पश्चिम बंगालमध्ये तो बेकायदेशीररीत्या प्रवेश मिळविण्यात यशस्वी झाला आणि स्थिरावला. पण नशीब अजमाविण्यासाठी तो मुंबईत आला. मालाड येथे त्याने एक चायनीज उपाहारगृह सुरू केले होते. हा व्यवसाय त्याचा चांगला सुरू होता. त्यामुळे त्याने मुंबईकर होण्याचे ठरवले. त्यासाठी पारपत्र असणे आवश्यक होते. त्याची गाठ मालाडच्या मढ येथे राहणाऱ्या भूपेश सुरती याच्याशी पडली.
भूपेशने त्याला पारपत्र बनविण्यासाठी दहावीची गुणपत्रिका, जन्माचा दाखला बनावट बनवावा लागेल असे सांगितले. त्यासाठी प्रत्येकी ७ हजार रुपये दरही ठरला. चक्रवर्ती त्यासाठी तयार झाला. सुरतीने त्याला हुबेहूब दहावीची गुणपत्रिका, जन्मदाखला बनवून दिला. पारपत्रासाठी त्यांनी अर्जही केला.
पडताळणीसाठी हा अर्ज चारकोप पोलीस ठाण्यात आला. पोलिसांनी कागदपत्रांवर सहज नजर टाकली तर चक्रवर्तीला दहावीच्या परीक्षेत मराठी विषयात ७९ गुण मिळाल्याचे दिसत होते.
अमराठी माणसाला एवढे चांगले गुण मिळाल्याबद्दल पोलिसांना आश्चर्य वाटले. त्याच्याशी मराठीत संभाषण करण्यास सुरुवात केली तर त्याला मराठी येत नव्हते. मग मात्र पोलिसांचा संशय बळावला आणि चौकशीत हा बनाव उघडकीस आला. चारकोप पोलिसांनी त्याला अटक केली.
सुरतीच्या घरी छापा टाकला असता तेथे बनावट कागदपत्र बनविण्याचे साहित्य, रबरी स्टँप आढळून आले. गेली पाच वर्षे तो बनावट पारपत्र बनवून देण्याचे काम करत होता. चक्रवर्ती आणि सुरती दोन्ही तुरुंगात आहेत. केवळ मराठीत अतिहुशारी दाखवल्याने चक्रवर्ती पोलिसांच्या जाळ्यात अडकला होता.