वसंतराव देशपांडे संगीत सभा विश्वस्त निधी या संस्थेतर्फे १४ मार्च रोजी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात ज्येष्ठ शास्त्रीय गायक पं. चंद्रकांत लिमये, गायिका आरती अंकलीकर-टिकेकर यांच्यासह पं. लिमये यांचा शिष्य परिवार आपल्या स्वराविष्कारातून ‘होरी-चैती’चे रंग उलगडणार आहे.
माटुंगा येथील यशवंत नाटय़मंदिरात दुपारी साडेतीन वाजता होणाऱ्या या कार्यक्रमासाठी सर्व रसिकांना विनामूल्य प्रवेश आहे. या खास संगीत मैफलीत होळीवरील बंदिशी, ठुमरी, दादरा आणि लोकसंगीतातील गाणी सादर होणार आहेत. कार्यक्रमात पं. लिमये यांचे स्वानंद भुसारी, सुनील पंडित, सीमा ताडे, ओंकार मुळे, मानसी मराठे, शीतल देशपांडे, प्राची भोईर, कनिका अभ्यंकर, दिलीप आचरेकर, निषाद नायर, प्रतिभा पारेख हे शिष्य सहभागी होणार आहेत.
कार्यक्रमाची संकल्पना आणि दिग्दर्शन पं. चंद्रकांत लिमये यांचे आहे. निवेदन भाऊ मराठे यांचे तर अतुल ताडे, मकरंद कुंडले, मिलिंद कुलकर्णी, राजेंद्र भावे, राज शिरोडकर यांची संगीतसाथ आहे.वसंतराव देशपांडे संगीत सभा विश्वस्त संस्थेतर्फे आतापर्यंत ५० कार्यक्रम सादर करण्यात आले आहेत. या कार्यक्रमाच्या विनामूल्य प्रवेशिका कार्यक्रमाच्या दिवशी दोन तास अगोदर ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ तत्त्वावर नाटय़गृहावर उपलब्ध होतील, अशी माहिती पं. लिमये यांनी दिली.