रेल्वेवर नेहमीपेक्षा जास्त गर्दी
विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी मुंबई शहर आणि उपनगरात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे बुधवारी उपनगरी गाडीने प्रवास करताना फारशी गर्दी नसेल, अशी प्रवाशांची अपेक्षा होती. मात्र मध्य आणि पश्चिम रेल्वेवर जलद आणि धिम्या दोन्ही मार्गावरील उपनगरी गाडय़ांमध्ये नेहमीसारखीच किंबहुना नेहमीपेक्षा जास्तच गर्दी पाहायला मिळाली. त्यामुळे सार्वजनिक सुट्टी आहे की नाही, असा प्रश्न प्रवाशांना पडला होता.
मुलुंडमध्ये गुजराती फलक
मुलुंड परिसरात मराठी आणि गुजराती भाषिक यांची संख्या मोठय़ा प्रमाणात आहे. त्यातही पूर्व भागात मध्यम आणि उच्च मध्यमवर्गीय मराठी भाषक जास्त प्रमाणात आहेत. तर पश्चिम भागात गुजराती वस्ती मोठय़ा प्रमाणात आहे. गुजराती मतदारांमध्ये मतदानाबाबत जनजागृती करण्यासाठी मुलुंड (पूर्व) भागात रेल्वे स्थानक परिसरात गुजराती भाषेतील फलक लावण्यात आलेला पाहायला मिळाला.
शाई लावली मधल्या बोटाला
मुलुंडमधील काही मतदान केंद्रांवर मतदान केल्यानंतर पहिल्या बोटाला शाई लावण्याऐवजी मधल्या बोटाला शाई लावली जात असल्याची तक्रार काही मतदारांकडून करण्यात आली. सगळीकडे डाव्या हाताच्या अंगठय़ाशेजारील पहिल्या बोटाला शाई लावली जात असताना आपल्या मधल्या बोटाला शाई का लावली जाते, असा प्रश्न या मतदारांना पडला. काही जणांनी या संदर्भात उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात दूरध्वनी करून तक्रार केली पण, त्याची दखल घेतली गेली नाही, असे एका मतदाराने सांगितले.
मॉलमध्ये गर्दी
मतदानासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली होती. त्यामुळे अनेक जणांनी मतदान करून मिळालेल्या या सुट्टीचा फायदा घेतला. दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्यामुळे खरेदी करण्यासाठी मतदान केल्यानंतर अनेकांची पावले सहकुटंब मॉलकडे वळली.
‘समाजासाठी मतदान करा’
समाजासाठी मतदान करा, असे भावनिक आवाहन करत शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे यासाठी सर्वपक्षीय प्रयत्न सुरू होते. मुस्लिमबहुल मतदारसंघात माजी आमदार अबु आझमी यांच्या समाजवादी पक्षातर्फे स्थानिक लोकांना मतदान कें द्रापर्यंत जाण्यासाठी रिक्षांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.  
मॉल उघडण्याआधीच रांगा
सकाळी सात वाजता सुरू झालेल्या मतदान केंद्रावर अगदीच तुरळक गर्दी दिसत होती. भल्या सकाळी उठून मतदानाला जाण्याचा निरुत्साह एकीकडे दिसत असला तरी दुसरीकडे मात्र मॉलच्या बंद दारासमोर सकाळी नऊ वाजता ग्राहकांनी गर्दी केल्याचे दुसऱ्या टोकाचे चित्र दिसत होते. कांदिवली पश्चिम, महावीर नगर येथे असलेल्या मॉलचे दरवाजे सकाळी दहा वाजता उघडतात. मात्र स्वस्त दिनाला होत असलेली गर्दीचा विचार करून बहुधा काही उत्साही ग्राहकांनी दरवाजे उघडण्याआधीच मॉलसमोर गर्दी केली होती. महत्त्वाचे म्हणजे त्यांच्यापैकी कोणाच्याही बोटावर काळा डाग दिसत नव्हता.
नाव नाही, सांगणारे मिसिंग..
मतदारयादीत नाव नाही, त्यामुळे मतदान करता आलेले नाही.. असे सांगणारे हजारो मतदार एप्रिलमध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत मतदानावेळी प्रत्येक मतदान केंद्रावर दिसत होते. मात्र यावेळी ‘यादीत नाव नाही’ अशी तक्रार फारशी कानावर पडली नाही.
ना योजना, ना सवलती..
लोकसभा निवडणुकांवेळी मतदात्यांसाठी विविध संस्था, मॉल, कंपन्यांनी योजना, सवलती जाहीर केल्या होत्या. मतदानाची शाई दाखवल्यास दहा टक्के सवलत, उपचार मोफत.. अशा सवलतींचा पाऊस पडला होता. विधानसभा निवडणुकांवेळी मात्र अशा कोणत्याही सवलती जाहीर करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे मतदान केल्यानंतर अनेकांनी पदरचे पैसे खर्च करून दिवाळी खरेदीकडे मोर्चा वळवला