कामाठीपुऱ्यातील वेश्यांकडे जाण्याचा सर्वात मोठा धोका म्हणजे त्यांना असणारी एड्सची लागण. पण या महिलांमध्ये आलेल्या कमालीच्या जागरूकतेमुळे त्यांच्यातील एड्सचे प्रमाण लक्षणीय घटले आहे. ‘मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्थे’च्या आकडेवारीनुसार तपासणी केलेल्या सुमारे २५ हजार वेश्यांपैकी केवळ १३७ वेश्यांना एड्सची लागण झाल्याचे दिसून येत आहे.
एड्सबद्दल गेल्या काही वर्षांपासून सातत्याने जनजागृती करण्यात येत आहे. सरकारी पातळीवर तसेच सामाजिक संस्थांनीही त्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मुंबई जिल्हे एडस नियंत्रण संस्थेने दिलेल्या माहितीनुसार एप्रिल २०१३ ते जानेवारी २०१४ या वर्षांत देहविक्री करणाऱ्या २५,२१२ महिलांची तपासणी करण्यात आली. त्यात केवळ १३७ महिला एचआयव्ही आणि एड्सबाधीत असल्याचे आढळले. समलिंगी संबंध असणाऱ्या १९,६१८ जणांची तपासणी करण्यात आली. त्यातील केवळ ८७ जणांना या रोगाची लागण झालेली दिसून आली. तर इंजेक्शनद्वारे नशा करणाऱ्या १,११३ पैकी ८७ तर १,७२६ ट्रक चालकांपैकी केवळ ७ जणांना एचआयव्ही आणि एड्सची बाधा झाल्याचे आढळून आले.
गेल्या तीन वर्षांपासून मुंबईतली एड्सचे प्रमाण घटत असल्याचे मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण संस्थेचे अतिरिक्त प्रकल्प संचालक डॉ. बाळकृष्ण अडसुळ यांनी सांगितले. सरकारी पातळीवर जनजागृतीचे प्रयत्न सुरू आहेतच. जोडीला स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातूनही प्रयत्न होत आहेत. त्यामुळेच हे समाधानकारक चित्र दिसत असल्याचे ते म्हणाले. जनजागृतीबरोबरच रुग्णांना संतुलित आहार दिला जातो. त्यासाठी विविध केंद्रात आहारतज्ज्ञांचीही नेमणूक करण्यात आली आहे.
एड्सचे घटलेले रुग्ण
(एप्रिल २०१३ ते जानेवारी २०१४)
रुग्णाचे प्रकार        तपासणी केलेल्यांची संख्या    रोगाची लागण झालेले

देहविक्रय करणारे        २५, २१२                          १३७
समलिंगी                     १९, ६१८                          १०२
स्थलांतरीत                  १५, १२३                          ८७
संदर्भ- मुंबई जिल्हे एडस नियंत्रण संस्था