मायानगरी मुंबईत अंमली पदार्थाचे जाळे मोठय़ा प्रमाणावर पसरल्याचे पुन्हा उघड झाले आहे. अगदी झोपडपट्टीतल्या छोटय़ा गल्ल्यांपासून उच्चभ्रू वर्ग, फिल्म इंडस्ट्रीला अंमली पदार्थांचा विळखा पडला आहे. चालू वर्षांत अंमली पदार्थ विरोधी पथकाने मुंबईत मोठय़ा प्रमाणावर कारवाई करून तब्बल १४ कोटी रुपये किंमतीचे अंमली पदार्थ जप्त केले आहे. गेल्या १५ वर्षांतली ही मोठी कारवाई असली तरी हे हिमनगाचे केवळ एक टोक असल्याचे पोलीसच मान्य करत आहेत.
अंमली पदार्थविरोथी पथकाचे पोलीस उपायुक्त विनायक देशमुख यांनी यासंदर्भात सांगितले की, मुंबईत अंमली पदार्थ पुरविणारी टोळी सक्रिय झाली आहे. अगदी झोपडपट्टीपासून ते हाय प्रोफाइल सोसायटय़ांमध्येही अंमली पदार्थाचे मोठय़ा प्रमाणावर सेवन होते. अंमली पदार्थ विरोधी शाखेची मुंबईत एकून ५ युनिट असून त्यांनी वर्षभर अनेक ठिकाणी छापे घातले आहेत. त्यात अंमली पदार्थांचा व्यवहार करणाऱ्यांविरोधात एकूण ४२७ गुन्हे दाखल करण्यात आले असून १९०० हून अधिक आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून तब्बल साडेसातशे किलो विविध प्रकारचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत. त्यांची किंमत १४ कोटी रुपयांहून अधिक आहे.
 अंमली पदार्थांमध्ये हेरॉइन, चरस, कोकेन, गांजा, अफू, अ‍ॅंफेटामाईन आदी पदार्थाचा समावेश होतो. कोकेनचा व्यवहार करणारे बहुतांश नायजेरीयन नागरिक आहेत. अ‍ॅंफोटामाईन सगळ्यात महाग आहे. ते परदेशात पुरवले जाते. चेन्नईहून ते मुंबईत आणले जाते. येथून ते तस्करी मार्गाने मलेशिया, दुबई आणि सौदी अरेबिया आदी देशांत पाठवले जाते. महिलांचा वापर या तस्करीमध्ये होत असल्याचे हवाई गुप्तचर विभागाने केलेल्या कारवायांमध्येही स्पष्ट झाले आहे. झोपडपट्टयांमध्ये चरस, गांजा, अफू आदी अंमली पदार्थांची सेवन आणि विक्री केली जाते. या अंमली पदार्थांच्या तस्करी करणाऱ्यांचे जाळे एवढे खोलवर पसरलेले आहे की पोलीस यंत्रणांना सुगावा लागताच ते आपला गाशा दुसरीकडे हलवितात. आफ्रिकी देशातले नागरिक अंमली पदार्थाच्या व्यवहारात असल्याचे पोलिसांनी मान्य केले. ते नोकरी, व्यवसाय आणि पर्यटनाच्या व्हिसावर येऊन हे उद्योग करतात. अशा लोकांना काळ्या यादीत टाकून त्यांना पुन्हा व्हिसा न देण्याची शिफारस करण्याची प्रक्रिया यापूर्वीच सुरू करण्यात आलेली आहे. कोकेन हे उत्तेजनात्मक अंमली द्रव्य आहे तर ब्राऊन शुगर, हेरॉईन हे अंमली पदार्थ नशेसाठी वापरले जाते.
महाविद्यालयीन तरुणांमध्येही अंमली पदार्थांचे व्यसन पसरले असून नुकतीच मुंबईतल्या मोठय़ा महाविद्यालयातल्या ५ तरुणांना अटक करण्यात आली होती. महाविद्यालयीन तरुणांना त्यापासून रोखण्यासाठी अंमली पदार्थ विरोधी पथकाने पुढाकार घेतला आहे. विभागातर्फे लवकरच महाविद्यालयांत जनजागृती अभियान सुरू करण्यात येणार असल्याचेही देशमुख यांनी सांगितले. नवीन वर्षांंच्या स्वागतानिमित्त मुंबईत मोठ्या प्रमाणावर पाटर्याचे आयोजन केले जाते. अशा पाटर्य़ावरही विशेष लक्ष ठेवण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

अंमली पदार्थ      एकूण प्रकरण    जप्त अंमली पदार्थ   अटक आरोपी        किंमत

हेरॉईन             १०                  दिड किलो              १५               १४ लाख

चरस                ३८                 ३६.५ किलो           ५३                ३५ लाख ४० हजार

कोकेन             २५                 ३ किलो                 ४०                १ कोटी ८३ लाख

गांजा               २०                 ५५० किलो            ३३                 ३९ लाख

अफू                १                   ७ कि लो                 ३                   ९ लाख

अ‍ॅंफेटामाईन      ८                   १२१ किलो             १५                ११ कोटी ४० लाख