मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलात विद्यार्थिनींकरिता असलेल्या तीन वसतिगृहांची देखभाल व दुरूस्तीअभावी दुरवस्था झाली असून अनेक ठिकाणी पाण्याची गळती सुरू आहे. भिंतींना ओल धरत असल्याने काही खोल्यांमध्ये सतत बुरशी धरून त्याचा संसर्ग विद्यार्थिनींना होण्याची भीती निर्माण झाली आहे. पण, फोर्टमधील कुलगुरूंच्या कार्यालयाबाहेरील व्हरांडय़ात वातानुकूलित यंत्रणा बसवून तो गारेगार करणाऱ्या विद्यापीठ प्रशासनाला विद्यार्थिनींना वसतिगृहात राहताना होणाऱ्या त्रासाची दखल घेण्याइतपत संवेदनशीलता अद्याप दाखविण्यात आलेली नाही.
अर्थशास्त्र विभागाचे प्राध्यापक नीरज हातेकर यांच्या निलंबनामुळे विद्यार्थी आणि प्राध्यापकांमध्ये उठलेल्या जनक्षोभानंतर कलिना संकुलात विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या स्तरावर सोसाव्या लागणाऱ्या समस्यांची व अडचणींची दखल घेऊ असे प्रशासनाने जाहीर केले होते. त्यानंतर या सर्व प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी विद्यापीठाने संजय शेटय़े (समन्वयक) यांच्यासह अधिसभा सदस्यांची समितीही नेमली. या समितीने मार्च-एप्रिल महिन्यात कलिनातील वसतिगृहांमध्ये पाहणी करून आपला अहवाल तयार केला आहे. या अहवालातही वसतिगृहांच्या दुरवस्थेवर बोट ठेवण्यात आले होते. मात्र, पावसाळा तोंडावर आला तरी वसतिगृहांमधील दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आलेले नाही.
कलिनामध्ये विद्यार्थिनींकरिता तीन वसतिगृहे आहेत. त्यापैकी सावित्रीबाई फुले यांच्या नावाने असलेले वसतिगृह पाचमजली आहे. पण, या वसतिगृहाच्या प्रत्येक मजल्यावरील न्हाणीघरात पाण्याची गळती होते. या गळतीमुळे न्हाणीघर कितीही वेळा साफ केले तरी घाण राहते. अंघोळ करून आल्यानंतर वरून गळणाऱ्या घाणरडे, दरुगधीयुक्त पाण्याचा वर्षांव झेलतच खोली गाठावी लागते, अशी तक्रार येथील एका विद्यार्थिनीने केली. इथले उपहारगृह सुट्टीकाळात बंद होते. परंतु, तिथे सध्या पाणी साचल्याने त्याचे डबके झाले आहे. या वसतिगृहाच्या प्रतीक्षालयात सोफे आहेत. पण, त्यांची अवस्था इतकी वाईट आहे की त्यावर कुणीच बसण्यास धजावणार नाही. इथला ध्वनिक्षेपक बिघडल्याने मुलींना निरोप देण्याकरिता सर्व मजले चढून जाण्याशिवाय पर्याय नसतो. फ्रीज आहे पण त्यात कुलींग होत नाही, अशी तक्रार एका विद्यार्थिनीने केली. अनेक मजल्यांवरील पाण्याचे कुलरही बंदच आहेत.
सध्या पावसाने दडी मारली असली तरी जूनच्या पहिल्याच आठवडय़ात झालेल्या थोडय़ाफार पावसानेही वसतिगृहांमध्ये पाण्याची गळती सुरू झाली. इथल्या महर्षी धोंडो केशव कर्वे मुलींच्या वसतिगृहामध्ये भिंतींना ओल येण्याचा प्रकार तर नित्याचाच आहे. या त्रासामुळे येथील काही खोल्या रिकाम्या ठेवाव्या लागल्या आहेत. कारण, भिंतींना सतत ओल येत असल्याने काही ठिकाणी धरणाऱ्या बुरशीमुळे विद्यार्थिनींना संसर्गजन्य आजार होण्याची भीती वर्तवण्यात येत आहे. सर्वच वसतिगृहांमध्ये मिळणाऱ्या अन्नाच्या दर्जाबाबत मुलींच्या तक्रारी आहेत
पलंग, गादी स्वत:चीच
सर्वच वसतिगृहांच्या दहा बाय दहा आकाराच्या खोल्या एकाच विद्यार्थिनीला गृहीत धरून बांधण्यात आल्या आहेत. पण, प्रत्येक खोलीमध्ये दोघींनी राहावे लागते आहे. दुसऱ्या पलंगाची किंवा गादीची सोयही विद्यार्थिनींनाच करावी लागते.
वसतिगृहांमधील नियमांबाबतही आक्षेप आहेत. येथे राहणाऱ्या मुलींना वर्षभरात पाच रात्र बाहेर राहता येते. तर वर्षांतून दोन वेळा उशीरा येण्याची परवानगी आहे. मात्र, त्याकरिता एक अर्ज भरून त्यावर वसतीगृहाच्या अधिक्षकेची स्वाक्षरी घ्यावी लागते. परंतु, या संदर्भातील माहिती संबंधित मुलीच्या पालकांना देण्यात येत नाही. हा प्रकार चुकींचा असून एकेका किंवा तीनतीन महिन्यांनंतर तरी संबंधित मुलगी किती रात्र वसतिगृहाच्या बाहेर राहिली. ती कितीवेळा उशीरा आली, याची माहिती पालकांन दिली गेली पाहिजे, अशी मागणी युवा सेनेच्या कार्यकर्त्यां व अधिसभा सदस्य निलिमा भुरके यांनी केली.
क्रीडा वस्तूंचाही खेळ
कर्वे वसतिगृहात मुलींना मनोरंजनाकरिता कॅरमबोर्ड देण्यात आले आहेत. परंतु, बसण्यासाठी खुच्र्या नसल्याने त्यावरचे पॅकिंगही अद्याप निघालेले नाही. त्यालाच लागून असलेल्या पं. रमाबाई वसतीगृहात लहानशा व्हरांडय़ातच टेबल टेनिसकरिता टेबल ठेवण्यात आला आहे. पण, जागेअभावी तो व्हरांडय़ातच उघडावा लागतो. आम्ही एकदा हा टेबल उघडला. परंतु, त्यानंतर कुणाला ये-जा करता येईनाशी झाली. त्यामुळे होणाऱ्या गैरसोयींना कंटाळून आम्ही हा टेबल पुन्हा कधीच वापरला नाही, असे एका विद्यार्थिनीने सांगितले. याच व्हरांडय़ात टीव्हीचीही व्यवस्था करण्यात आली आहे. पण, येथे बसून टीव्ही पाहण्याची सोय नाही. म्हणजे विद्यार्थिनींच्या मनोरंजनासाठी देण्यात आलेल्या क्रीडा वस्तूंचाही खेळच मांडण्यात आला आहे, अशी टिप्पण्णी शेटय़े समितीचे सदस्य प्रदीप सावंत यांनी केली.