भारतात प्रथमच साजरा होणारा पुरातत्त्व दिन मुंबई विद्यापीठात साजरा होत आहे, याचे औचित्यच वेगळे असून त्यामुळेच अतिशय उत्तम ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या मुंबई विद्यापीठामध्ये पुरातत्त्वशास्त्राचा स्वतंत्र विभाग सुरू करण्याच्या विचारला चांगले पाठबळ मिळाल्याचे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजन वेळुकर यांनी अलीकडेच येथे केले.
मुंबई विद्यापीठाच्या बहिशाल शिक्षण विभागाच्या वतीने आणि पुणे येथील डेक्कन कॉलेजच्या सहकार्याने या भारतीय पुरातत्त्व दिनाचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय पुरातत्त्वशास्त्राचे भीष्माचार्य डॉ. हसमुख धीरजलाल सांकलिया यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याचे उद्घाटन डेक्कन कॉलेज या अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. गो. बं. देगलुरकर यांच्या हस्ते पार पडले. आपल्या भाषणात डॉ. देगलुरकर यांनीच मुंबई विद्यापीठासारख्या अग्रेसर विद्यापीठात हा विभाग नाही, याची खंत व्यक्त करत पुढाकार घेऊन हा विभाग सुरू करण्याचे आवाहन कुलगुरू डॉ. वेळुकर यांना केले होते. डॉ. देगलुरकर म्हणाले की, पुरातत्त्व विद्या म्हणजे केवळ गाडलेले उकरणे हा गैरसमज आहे. या गाडलेले उकरण्यातून माणसाला त्याच्या भूतकाळाची कोडी सोडवता येतात आणि भविष्याचा अंदाज तर येतोच पण मार्गदर्शनही लाभते.
या पुरातत्त्व दिनाच्या निमित्ताने विविध संस्थांनी एकत्र येऊन आपापले स्टॉल्स प्रदर्शनामध्ये लावले होते. त्यात वारली चित्र, आदिवासी शिल्पकृती, पुरातत्त्व विषयावरील पुस्तकांचे स्टॉल्स आदींचा समावेश होता.  
सर्वाधिक प्रतिसाद उत्खननाला !
पुरातत्त्वशास्त्र म्हणजे उत्खनन एवढेच लोकांना माहीत असते. पण उत्खनन म्हणजे नेमके काय, पुराणवस्तूंचा शोध कशाप्रकारे घेतला जातो, त्याची नोंद कशाप्रकारे केली जाते, त्याची ओळख कशी पटवली जाते या सर्व बाबींचा सामान्यांना अनुभव घेता यावा म्हणून बहिशाल शिक्षण विभागाच्या आवारामध्येच एक उत्खननानाचा खड्डा खणण्यात आला होता. आणि त्यात आधीच काही पुराणवस्तू दडवून ठेवलेल्या होत्या. तिथे येणाऱ्या लहान मुलांना पुरातत्त्वतज्ज्ञाच्या पद्धतीने शोध घेत, ज्येष्ठ विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनाखाली त्या वस्तू शोधायच्या होत्या. विद्यार्थ्यांना या शास्त्राचा परिचय जवळून व्हावा, हा त्या मागचा हेतू होता. या उत्खनन प्रकल्पाला सर्वाधिक प्रतिसाद मिळाला. त्याचबरोबर ब्राह्मी आणि खरोष्टी लिपीमध्ये आपले नाव लिहून घेण्यासाठीच्या स्टॉलवरही अनेकांनी गर्दी केली होती.