‘अंगापेक्षा बोंगा मोठा’ ही म्हण मुंबई विद्यापीठातर्फे विद्यार्थ्यांना गुणपत्रिकेच्या नावाखाली दिल्या जाणाऱ्या कागदी भेंडोळ्याला निश्चितपणे लागू होईल. साधारणपणे एक फूट लांबी-रुंदी असलेली ही भलीमोठी गुणपत्रिका केवळ सांभाळणेच नव्हे तर फोटोकॉपी करण्याच्या दृष्टीनेही अव्यवहार्य आहे.
मुंबई विद्यापीठातर्फे पदवी, पदव्युत्तर, अभियांत्रिकी अशा विविध अभ्यासक्रमांकरिता वेगवेगळ्या प्रकारच्या गुणपत्रिका दिल्या जातात. परंतु, एमए-१ आणि भाग २ या अभ्यासक्रमांसाठी विद्यापीठाने दिलेल्या गुणपत्रिका ‘अवाढव्य’ आकाराच्या आहेत. इतक्या मोठय़ा आकाराची गुणपत्रिका अव्यवहार्य आहे. ती कोणत्याही सॅक किंवा बॅगेत राहत नाही. त्यासाठी सूटकेस हा एकच पर्याय असू शकेल. महत्त्वाचे म्हणजे इतकी मोठी गुणपत्रिका ए-फोर आकाराच्या कागदावर फोटोकॉपी करणेही शक्य होत नाही.
विद्यापीठाने सर्वच अभ्यासक्रमांना सत्र पद्धती लागू केल्याने काही विषयाच्या गुणपत्रिकेचा आकार अवाढव्य झाला. सर्वात मोठी गुणपत्रिका एमएस्सीची आहे. त्या खालोखाल एमएची आहे. एमएची गुणपत्रिका एमएस्सीच्या गुणपत्रिकेपेक्षा लांबीने थोडीच कमी आहे. पण, रुंदीला तेवढीच आहे. टीवायबीएची गुणपत्रिकाही अशीच अवाढव्य असून ती दुमडून ठेवण्याशिवाय पर्याय नाही, अशी विद्यार्थ्यांची तक्रार आहे. याप्रकरणी मुंबई विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक दिनेश भोंडे यांच्याशी वारंवार संपर्क साधूनही संपर्क होऊ शकला नाही.