पोलीस आयुक्त राकेश मारिया यांना मुंबईतील गुन्हेगारी विश्वाची असलेली खडान्खडा माहिती आणि त्यांचे खबऱ्यांचे प्रचंड जाळे यातूनच शीना बोरा हत्या प्रकरणाची उकल झाली आहे. एका बडय़ा व्यक्तीकडून मारिया यांना या हत्येबाबतची खबर मिळाली आणि गायब झालेली शीना तसेच तिच्या गायब होण्यात तिची आई इंद्राणी मुखर्जी हिचा असलेला संबंध उलगडत गेला. अर्थात शीनाच्या सेलफोनच्या ‘लोकेशन’मुळे पोलिसांचा संशय बळावला होताच आणि त्यातूनच घटनाक्रमाची संगती लावताना शीनाची हत्या झाल्याचे स्पष्ट झाले.२४ एप्रिल २०११ रोजी वांद्रे येथील नॅशनल महाविद्यालयाबाहेर इंद्राणी मुखर्जी यांनी शीनाला जबरदस्तीने गाडीत कोंबले आणि पूर्व द्रुतगती महामार्गावर तिची गळा आवळून हत्या केली. त्या वेळी तिचा दुसरा पती संजीव खन्ना आणि चालक शाम राय गाडीत होते. शीनाला सोडण्यासाठी तिचा प्रियकर राहुल मुखर्जी तेथे आला होता. सलग दोन दिवस शीनाशी संपर्क न झाल्याने राहुलने सुरुवातीला खार पोलिसांशी आणि नंतर इंद्राणीच्या निवासस्थानाजवळच्या म्हणजे वरळीतील पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. खार पोलिसांनी राहुलला दाद दिली नाही. वरळी पोलीस ठाण्यातील शिपाई इंद्राणींच्या घरी गेला असता शीना अमेरिकेत गेल्याचे त्याला सांगण्यात आले. स्टार टीव्हीचे माजी मुख्य अधिकारी असलेल्या प्रतिष्ठीत पीटर मुखर्जीची इंद्राणी पत्नी असल्यामुळे पोलिसांनी अधिक चौकशी केली नाही. त्यानंतर लगेचच शीनाच्या मोबाइल फोनवरून राहुलला अनेक संदेश आले. मला यापुढे तुझ्याशी संबंध ठेवण्यात रस नाही आणि मी अमेरिकेत स्थलांतरित झाल्याच्या आशयाचे ते संदेश होते.शीना अमेरिकेत स्थिरावल्याचे इंद्राणी सांगत असल्या तरी राहुलचा त्यावर विश्वास बसत नव्हता. त्याने तिच्या मोबाइल क्रमांकावर वारंवार संपर्क साधला, लघुसंदेश पाठविले परंतु प्रतिसाद मिळाला नाही. एकदा शीनाने फोन उचलल्यानंतर त्याला रडण्याचा आवाज आला. मात्र तो आवाज शीनाचा होता की इंद्राणीचा हे राहुलला कळू शकले नव्हते. शीनावर प्रेम करणारा राहुल त्यामुळे अस्वस्थ झाला होता. शीना आपल्याला का टाळत आहे, हे त्याला कळत नव्हते. तो सतत तिचा शोध घेत होता. फेसबुकवर त्याने शीनाला अनेक संदेश पाठविले. परंतु शीनाचे फेसबुक खाते बरेच दिवस वापरात नसल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यामुळे राहुलने शीनाच्या अमेरिकेतील मैत्रिणींशी संपर्क साधला. शीना अमेरिकेत असती तर तिने माझ्याशी नक्कीच संपर्क साधला असता, असे उत्तर त्याला मिळाले.अस्वस्थ झालेल्या राहुलला शीनाबाबत काहीच माहिती मिळत नव्हती. अनेकांजवळ त्याने ही व्यथा बोलून दाखविली होती. शीनाचे नेमके काय झाले हे कळले की आपणच तिचा नाद सोडून देऊ, असेही राहुल काही निकटवर्तीयांजवळ बोलून दाखवित होता.लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असल्यामुळे राहुल-शीनाचे संबंध अनेकांना माहिती होते. त्यांच्या मित्र-मैत्रिणींनीही शीनाचा शोध सुरू केला. परंतु हाती काहीही लागत नव्हते. निराश झालेला राहुल शीनाच्या शोधात होता. त्यातूनच दोन महिन्यांपूर्वी मारिया यांना खात्रीलायक खबर गेली आणि खार पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिनेश कदम यांनी तपास सुरू केला. तपासात शीनाची हत्या झाल्याची माहिती बाहेर आली. मारिया यांना राहुलमार्फतच बडय़ा व्यक्तीने टीप दिल्याची चर्चा आहे. शीनाचे नेमके काय झाले हे गूढ उकलणे महत्त्वाचे वाटल्याने तपास सुरू झाला आणि अंगावर शहारे आणणाऱ्या हत्येची उकल झाली.
केवळ मोबाइल लोकेशनमुळेच..
२४ एप्रिल २०१२ रोजी शीना, इंद्राणी, संजीव खन्ना, चालक शाम राय यांच्या मोबाइल लोकेशनचा तपास साधारण दोन महिन्यांपूर्वी  सुरू झाला. शीनाचे लोकेशन भारतातच आढळले. तेही इंद्राणीच्या मोबाइल लोकेशनसोबत. २४ एप्रिलला शीना, इंद्राणी, संजीव आणि शाम या चौघांचे लोकेशन मुंबईत वांद्रे येथे तर दुसऱ्या दिवशी रायगड जिल्ह्य़ातील गागोद येथे आढळले. त्यामुळे पोलिसांनी सुरुवातीला शाम रायला ताब्यात घेतले. गोळीबार रोड येथे राहणारा राय हा घटनेचा प्रमुख साक्षीदार होता. मारिया यांनी त्याला बोलते केले. शामचा कबुलीजबाब मिळवायला वेळ लागला नाही. काही क्षणांतच त्याने घटनाक्रम उघड केला. त्यानंतरच इंद्राणीला अटक करण्याचा निर्णय घेण्यात आला. इंद्राणीच्या अटकेची माहिती बाहेर जाऊ नये, याची पुरेपूर काळजी घेतली गेली होती. रायगडचे अधीक्षक सुवेझ हक यांनाही प्रसारमाध्यमांशी न बोलण्याचा सल्ला देण्यात आला होता. परंतु खार पोलीस ठाण्यातूनच माहिती बाहेर गेली आणि या प्रकरणाचा बोभाटा झाला.