मुंब्रा, कळव्याचा न्याय ठाण्याला कधी ?
सॅटिसच्या उभारणीनंतरही जागोजागी होणारी वाहतुकीची कोंडी, रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला खासगी बस चालक तसेच फेरीवाल्यांच्या उपद्रवामुळे पादचाऱ्यांना होणारा त्रास, नाकानाक्यावर सुरू असणारी रिक्षाचालकांची मनमानी, पुलाखाली बसणाऱ्या फेरीवाल्यांचा उपद्रव आणि विस्कळीत वाहनतळामुळे स्थानकाच्या दिशेने येणाऱ्या प्रवाशांचे दररोज होणारे हाल असे दररोजचे चित्र नेमके बदलणार तरी कधी, असा प्रश्न आता सर्वसामान्य ठाणेकरांना पडला आहे.
नियोजनाच्या अभावामुळे अगदी कालपरवापर्यंत अतिशय विस्कळीत आणि ओंगळवाणी वाटणारी कळवा आणि मुंब्रा या दोन्ही रेल्वे स्थानक परिसराचा चेहरामोहरा ठाणे महापालिकेने बदलला आहे. कत्तलखाना, मासळीबाजार, अनधिकृत फेरीवाले, त्यामुळे नकोशी होणारी वाहतुकीची कोंडी, अतिक्रमणांचा विळख्यामुळे कळवा आणि मुंब्रा या दोन्ही स्थानकांमधून प्रवास म्हणजे दिव्य असायचे. ठाणे महापालिकेने गेल्या दोन वर्षांपासून प्रयत्नपूर्वक हाती घेतलेल्या विकासकामांमुळे ही दोन्ही स्थानके प्रवाशांसाठी नंदनवन ठरू लागली असताना सर्वाधिक गर्दीचे स्थानक म्हणून चर्चेत असलेल्या ठाणे स्थानक परिसराचे नियोजन मात्र पूर्णपणे ढेपाळल्यासारखे चित्र दिसत आहे. विशेष म्हणजे, गेली अनेक वर्षे ठाण्यावर भावनिक हक्क सांगणाऱ्या सत्ताधारी शिवसेनेतील नेत्यांचीही या अनागोंदीकडे डोळेझाक सुरू असून सॅटिस उभारून आपले काम संपले, अशा थाटात हे नेते वावरू लागले आहेत.
मुंबई रेल्वे विकास महामंडळाने नुकत्याच केलेल्या एका सर्वेक्षणात ठाणे हे सर्वाधिक गर्दी खेचणारे स्थानक म्हणून घोषित करण्यात आले आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि दादर यांसारख्या मोठय़ा स्थानकांनाही ठाण्याने गर्दीच्या आघाडीवर केव्हाच मागे सोडले आहे. ठाण्यातील गर्दी कमी व्हावी यासाठी विस्तारित रेल्वे स्थानकाच्या प्रस्तावावर गेल्या काही वर्षांपासून ठाणे महापालिका काम करत आहे. कोपरी भागात मनोरुग्णालयाच्या जागेवर नवे स्थानक उभारून पश्चिमेकडे जाणाऱ्या प्रवाशांना तेथून थांबा द्यावा, असा प्रस्ताव महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेच्या नेत्यांनी आयुक्त आर.ए.राजीव यांना हाताशी धरून अगदी प्रयत्नपूर्वक पुढे रेटला आहे. असे असले तरी या मोठय़ा प्रस्तावांना रेल्वे तसेच राज्य सरकारचा हिरवा कंदील मिळविण्यात अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. हे मोठे प्रकल्प मार्गी लागावेत यासाठी एकीकडे प्रयत्न सुरू असले तरी रेल्वे स्थानकाच्या परिसरात नियोजनाचा झालेला खेळखंडोबा निस्तरण्याकडे मात्र महापालिकेला फारसा रस नाही, असेच चित्र गेल्या काही दिवसांपासून दिसून येत आहे.
सॅटिसचाही गोंधळ सुरूच
रेल्वे स्थानक परिसरातील प्रवाशांची गर्दी कमी व्हावी आणि येथील वाहतुकीचे नियोजन करता यावे यासाठी उभारण्यात आलेला सॅटिसच्या प्रयोगात अनेक त्रुटी शिल्लक आहेत, हे केव्हाच स्पष्ट झाले आहे. सॅटिसवर एखादी बस बंद पडताच कसा गोंधळ उडतो हे अनेकदा दिसून आले आहे. रेल्वे स्थानक परिसरातील समस्या मार्गी लावणे महापालिकेस सहज शक्य आहे. मात्र, येथील फेरीवाल्यांचा उपद्रव, वाहतुकीची होणारी कोंडी, खासगी बसचालकांचे अतिक्रमण, रिक्षाचालकांची मनमानी रोखण्यात महापालिका तसेच वाहतूक पोलिसांना म्हणावे तसेच यश आलेले नाही. शिवसेनेचे आमदार एकनाथ िशदे यांनी मध्यंतरी रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला कोपरीपर्यंत रस्त्यांच्या रुंदीकरणासाठी आयुक्तांसमवेत एक दौरा केला. मात्र या दौऱ्याचे फलित अजूनही स्पष्ट झालेले नाही. कळवा तसेच मुंब्रा रेल्वे स्थानक परिसर सुधारण्यासाठी दिवसरात्र मेहनत घेणाऱ्या महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना ठाण्याच्या आघाडीवर अपयश का येते, असा सवाल सर्वसामान्य ठाणेकरांना पडला        आहे.

शिवसेनेचे आमदार गेले कुठे ?
ठाणे शहरात शिवसेनेचे तीन आमदार आहेत. यापैकी एक आमदार महापालिका आयुक्तांसोबत असलेले हिशेब चुकते करण्यातच मग्न असल्याचे चित्र आहे. दुसरा आमदार आपण कसे सॅटिसचे निर्माते आहोत, हे सांगण्यातच धन्यता मानतात; तर ठाण्याचे सर्वेसर्वा म्हणविणारे तिसरे आमदार सध्या मातोश्रीची खप्पा मर्जी दूर करण्यातच व्यग्र असल्याचे चित्र आहे. कळवा, मुंब््रयात विकासासाठी तेथील लोकप्रतिनिधी कंबर कसताना दिसत असताना ठाण्यातील आमदार गेले कुठे, असा सवाल सातत्याने उपस्थित होत आहे.

रेल्वे स्थानक परिसराच्या विकासासाठी ठाण्यातील शिवसेनेचे तिन्ही आमदार प्रयत्नशील असून रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडून कोपरीपर्यंत रस्त्याचे रुंदीकरण आणि सॅटिसच्या धर्तीवर एखादा प्रकल्प उभारण्यासाठी सल्लागार नेमण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे, असा दावा महापालिकेतील सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी केला. अर्थसंकल्पात या प्रकल्पांसाठी खास तरतूद करण्यात आली आहे. रेल्वे स्थानक परिसरात सॅटिस प्रकल्प कुणामुळे उभा राहिले हे संपूर्ण ठाणेकरांना माहीत आहे. पूर्वेकडील प्रश्न सोडविण्यासाठी आमदार एकनाथ िशदे जिवाचे रान करत आहेत हे तुम्हाला दिसत नाही का, असा सवालही म्हस्के यांनी उपस्थित केला.