धोकादायक इमारतींमधील  रहिवाशांना कौसा येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील घरे उपलब्ध करून देण्यास राज्य सरकार अनुकूल नसल्यामुळे मुंब्रा, कौसा भागातील अतिधोकादायक इमारतींमधील रहिवाशी ठाण्यात आश्रयाला येणार यावर आता शिक्कामोर्तब होऊ लागले आहे. मुंब्रा, कौसा परिसरातील धोकादायक इमारतींमधील रहिवाशांना ठाण्यात हलविण्याऐवजी कौसा परिसरात त्यांचे पुनर्वसन केले जावे, यासाठी शिवसेनेचे स्थानिक नेते कमालीचे आग्रही होते. असे असताना ठाण्याचे नवनियुक्त महापालिका आयुक्त असीम गुप्ता यांनी शिवसेनेच्या दबक्या आवाजातील विरोधाला केराची टोपली दाखवत मुंब््रयातील ३३ कुटुंबांना वर्तकनगर परिसरात आणल्यामुळे शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांमध्ये कमालीची अस्वस्थता व्यक्त होऊ लागली आहे. विशेष म्हणजे, कौसातील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील घरांचे दरवाजे बंद झाल्यामुळे मुंब््रयातील ५०० अधिक कुटुंबे वर्तकनगर परिसरात हलविण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून शिवसेनेला हा ‘असीम’ धक्का मानला जात आहे.
ठाणे, कळवा, मुंब्रा परिसरात सुमारे १०४२ धोकादायक इमारती असून त्यांपैकी ५७ इमारती या अतिधोकादायक आहेत. या इमारतींमधील रहिवाशांचे तातडीने स्थलांतर करण्याचा निर्णय मध्यंतरी महापालिकेने घेतला. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या आदेशानुसार वर्तकनगर परिसरात एमएमआरडीएने उभारलेली सुमारे १४०० घरे महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आली आहेत. या घरांमध्ये ठाणे, कळवा, मुंब्रा परिसरातील रहिवाशांचे स्थलांतर केले जावे, असे गृहीत धरण्यात आले होते. मात्र, महापालिकेतील शिवसेनेच्या काही नेत्यांनी मुंब््रयातील रहिवाशांचे वर्तकनगर भागात स्थलांतर करण्यास विरोध केला. मुंब््रयातील रहिवाशांना कौसा परिसरातील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील घरांमध्ये स्थलांतरित केले जावे, जेणेकरून तेथील रहिवाशांनाही सोयीचे पडेल, अशी सावध भूमिका शिवसेनेच्या नेत्यांनी घेतली. वर्तकनगरचा संपूर्ण परिसरात शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या परिसरात काही ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादीचे नगरसेवक निवडून आले असले तरी शिवसेनेला मानणारा एक मोठा वर्ग या भागात वास्तव्यास आहे. त्यामुळे स्थानिक शिवसेना नेत्यांनीही वर्तकनगरमध्ये मुंब्रा वसविण्यास विरोध सुरू केला होता. असे असले तरी शिवसेनेच्या शहरातील तीन आमदारांनी या विषयावर मौन स्वीकारल्याने नवे आयुक्त असीम गुप्ता यांनी मुंब््रयातील रहिवाशांना वर्तकनगर येथे स्थलांतरित करण्यास सुरुवात केली आहे. कौसातील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील घरे धोकादायक इमारतींमधील रहिवाशांसाठी उपलब्ध करून देण्यास राज्य सरकार फारसे सकारात्मक नाही. त्यामुळे पावसाळ्यात मुंब््रयातील रहिवाशांना आणखी धोक्यात टाकण्याऐवजी त्यांचे तातडीने स्थलांतर केले जावे, यासाठी नवे आयुक्त कमालीचे आग्रही होते. त्यानुसार महापालिकेने ही कार्यवाही सुरू केली असून शिवसेनेला त्यामुळे धक्का बसला आहे. पहिल्या टप्प्यात मुंब््रयातील ३१ कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले असून यापुढेही मुंब््रयातील रहिवाशांना ठाण्यात आणले जाईल, असे महापालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने वृत्तान्तला सांगितले.ू