आपला हक्काचा बालेकिल्ला सोडून अन्य सहा विधानसभा मतदारसंघांत महायुती, मनसे किंवा राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी यांमधील जो उमेदवार दुसऱ्या क्रमांकाची मते घेईल तो उमेदवार कल्याणचा सुभेदार ठरणार आहे. विजयासाठी उमेदवाराला दोन लाख ५० ते ६० हजाराचा जादूई आकडा पार करावा लागणार आहे. आतापर्यंत उमेदवाराच्या विजयाचे भवितव्य ठरवणारा केंद्रबिंदू डोंबिवलीत असायचा. यंदा प्रथमच मोदी लाटेमुळे हा केंद्रबिंदू मुंब््रय़ाकडे सरकला आहे. राष्ट्रवादीच्या आनंद परांजपे यांची सारी भिस्त मुंब्रा येथे त्यांना किती आघाडी मिळते यावर अवलंवून आहे. त्यांना तिथे कमी आघाडी मिळाली तरच शिवसेनेला कल्याणचा बालकिल्ला राखता येणार आहे. नव्याने वाढलेली नव तरूण किंवा नव मतदारांची २ लाख ५२ हजार मते विजयी उमेदवाराचे भवितव्य ठरवणार आहेत. विजयी होणारा कोणीही उमेदवार किमान २० ते २५ हजारांच्या फरकाने विजयी होणार आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघात या वेळी आठ लाख २७ हजार ३७५ मतदान झाले. २००९ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी कल्याण मतदारसंघात पाच लाख ७५ हजार मतदान झाले होते. त्यामुळे वाढलेला दोन लाख ५२ हजार मतदार या वेळी निर्णायक भूमिका बजावणार आहेत. कल्याण लोकसभा मतदारसंघात अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण पूर्व, डोंबिवली, कल्याण ग्रामीण आणि कळवा-मुंब्रा हे विधानसभेचे सहा मतदारसंघ आहेत. त्यापैकी उल्हासनगर सोडले तर पाच विधानसभा मतदारसंघांत लोकसभेसाठी या वेळी प्रत्येकी सुमारे एक लाख ३९ हजार ते एक लाख ५१ हजारदरम्यान मतदान झाले आहे. प्रत्येक मतदारसंघातून महायुती, मनसे किंवा आघाडीपैकी कोणीही जो उमेदवार ४० ते ५० हजार मताधिक्य मिळवून पुढे जाईल तो उमेदवार विजयाची पताका फडकवणार आहे. या तिन्ही मतदारसंघांमध्ये जो उमेदवार सतत दुसऱ्या क्रमांकावर राहून आपल्या हक्काच्या बालेकिल्ल्यात ६० ते ७० हजारांहून अधिक मते घेण्याची बाजी मारील त्या उमेदवारालाही कल्याणच्या सुभेदारीचा मान मिळणार आहे. डोंबिवली विधानसभेत शिवसेनेचे डॉ. श्रीकांत शिंदे प्रथम क्रमांकावर राहतील. कल्याण ग्रामीण मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमोद (राजू) पाटील आणि कळवा-मुंब्रामध्ये आघाडीचे आनंद परांजपे आघाडीवर असणार आहेत. या मतदारसंघांव्यतिरिक्त अन्य विधानसभा मतदारसंघांत हे तिन्ही उमेदवार किती मते घेतात आणि एकमेकांची मते किती खातात यावर या तिन्ही उमेदवारांचे भवितव्य अवलंबून आहे. या तीनपक्षीय उमेदवारांव्यतिरिक्त अन्य आप, बसपासारखे अपक्ष उमेदवार एकूण ७० ते ८० हजार मतांचे धनी होणार आहेत. आठ लाख २७ हजार एकूण मतदानाचा विचार करता अपक्षांनी खाल्लेली ८० हजार मते, तिन्ही उमेदवारांनी आपल्या बालेकिल्ल्यासह अन्य मतदारसंघांत मिळवलेल्या एकूण प्रत्येकी दोन लाख ४० हजार मतांचा विचार करता २ लाख ५० हजारांचा जादूई आकडा जो उमेदवार पार करेल तो कल्याण लोकसभेचा सुभेदार होईल.

युती-आघाडी दोघांचेही विजयाचे दावे
राष्ट्रवादीचे नेते मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघातून आघाडीला चाळीस हजार मते मिळतील, अशी गणिते करीत आहेत; तर मनसेचे नेते मुंब््रय़ातील काही पारंपरिक व नवमतदार मनसेकडे वळवण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत, असा दावा करीत आहेत. हक्काची मते सोडली तर उल्हासनगर, मुंब्रामधील मते ही आम्हाला यशाकडे नेतील, असेही मनसे नेत्यांकडून सांगण्यात येते. तर डोंबिवली, अंबरनाथ, कल्याण पूर्व, ग्रामीण हे आमचे बालेकिल्ले आहेत. हे गड आमच्याच पाठीशी आहेत, असा दावा शिवसेनेकडून करण्यात येत आहे.

विधानसभानिहाय आकडेवारी
अंबरनाथ विधानसभा – एक लाख ३९ हजार ३९, उल्हासनगर- एक लाख १५ हजार ८६६, कल्याण पूर्व- एक लाख ३३ हजार १२७, डोंबिवली- एक लाख ४७ हजार ११७, कल्याण ग्रामीण- एक लाख ५१ हजार ५६१, मुंब्रा-कळवा- एक लाख ४० हजार ६६५.