हिंदुस्थानात एकेकाळी प्रथम क्रमांकाचे राज्य असलेल्या महाराष्ट्राची स्थिती बिहार अन् उत्तरप्रदेशपेक्षाही बिकट असून, युतीच्या काळात ३६ हजार कोटींचे कर्ज असताना शरद पवार यांनी महाराष्ट्राचे दिवाळे निघाल्याची ओरड केली होती. आज त्यांचे पुतणे अजित पवार उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री असताना महाराष्ट्रावर २ लाख ८७ हजार कोटींचे कर्ज असून, महाराष्ट्राचे महादिवाळे निघाल्याने उत्पन्न व्याजातच जाऊन राज्याची प्रगती खुंटल्याची टीका भाजपनेते गोपीनाथ मुंडे यांनी केली. यावर महाराष्ट्रातील आघाडी शासनकर्त्यांना सुबुद्धी द्या म्हणून उद्या बुधवारी सकाळी येथील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरच्या दौऱ्यावर आलेले मुंडे कराड विमानतळावर पत्रकार बैठकीत बोलत होते. आमदार चंद्रकांत पाटील, पूनम महाजन, संभाजीराव पवार यांच्यासह भाजपाचे स्थानिक नेते व पदाधिकारी उपस्थित होते. मुंडे म्हणाले,की अजित पवारांनी यशवंतराव चव्हाणांच्या येथील समाधीस्थळी आत्मक्लेश उपोषण केले, म्हणून मी उद्या समाधीस्थळी जातोय असे नाही. यामागे कोणतेही राजकारण नसून, महाराष्ट्राच्या या महान नेत्याच्या जन्मशताब्दीनिमित्त समाधीचे दर्शन घेण्यासाठी आपण जात आहोत. यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राचा भक्कम पाया घातला. मात्र, या शासनाला महाराष्ट्राचा कळसही उभारता आला नाही. यशवंतराव चव्हाणांच्या स्वप्नातील समृध्द व सुखी महाराष्ट्रात गत १३ वर्षांत काँग्रेस आघाडीच्या शासनामुळे प्रगती ऐवजी अधोगती झाली. सिंचन प्रकल्पांवर वारेमाप पैसा खर्च केला गेला. मात्र, त्यातून लोकांना बिलकूल पाणी मिळाले नाही. तरी सिंचन प्रकल्पातील भ्रष्टाचाराची चौकशी आम्ही सत्तेत आल्यावर करू असे त्यांनी आवर्जून नमूद केले. लोकसभा व विधानसभा निवडणुकात महायुतीला यश मिळण्यासाठी रणनीती आखतानाच प्रत्यक्ष महाराष्ट्रभर फिरून जनतेला जागृत करण्याचे काम केले जाणार आहे. सर्वत्र आघाडीविरोधातील छोटय़ा-छोटय़ा पक्ष संघटनांनाही बरोबर घेण्यात येणार आहे. त्यांचे अस्तित्व स्वतंत्र राखले जाईल, कोणत्याही संघटनेला थेट विलीन करून घेण्यात येणार नसल्याचे सांगाताना, पश्चिम महाराष्ट्रात विनय कोरे वगळता बाकी सर्व छोटे-मोठे आघाडीविरोधक आपल्या संपर्कात असल्याचे स्पष्ट करताना, विनय कोरे आपल्या संपर्कात नसल्याची प्रांजळ कबुली त्यांनी दिली. महायुतीत मनसेला सामावून घेणार किंवा काय यासंदर्भात त्यांनी सध्यातरी भाजपा, सेना, रिपाइं यांचीच युती आहे. त्यात आणखी कोणी नसल्याचे सांगून अधिक बोलणे टाळले. राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी नुकत्याच घेतलेल्या भेटीसंदर्भात विचारले असता, त्यांचे माझ्याशी मित्रत्वाचे चांगले नाते असून, मला त्यांच्याबद्दल नितांत आदर आहे. माझा आणि उदयनराजेंचा स्नेह उभ्या महाराष्ट्राला व राष्ट्रवादीलाही माहिती नाही असे नाही, असे हसत सांगताना, काही कामासाठी उदयनराजे भेटले. मात्र, ती राजकीय भेट नसल्याचा निर्वाळा त्यांनी दिला. प्रकाश आंबेडकरांच्या आघाडीचा नेमका कोणाला फटका बसेल हे सांगता येणार नसल्याचे मत मुंडे यांनी व्यक्त केले.