मागील लोकसभा निवडणूक प्रचारात रेल्वेमार्ग पूर्ण करण्याचे आश्वासन खासदार गोपीनाथ मुंडे यांनी आपल्या जाहीरनाम्यात दिले होते. मात्र, नवीन रेल्वे सोडाच, परळीच्या रेल्वेला नवीन डबाही जोडला नाही. संसदेत पहिल्या रांगेत बसूनही लोकसभेतील त्यांची कामगिरी निराशाजनक राहिली. त्यामुळे त्यांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करण्याचा नतिक अधिकार नाही, असा पलटवार राष्ट्रवादीचे आमदार अमरसिंह पंडित यांनी पत्रकातून केला.
महायुतीच्या महाएल्गार मेळाव्यात मुंडे यांनी शक्तिप्रदर्शन करताना पवार काका-पुतण्यांना लक्ष्य केले. या पाश्र्वभूमीवर पंडित यांनी हे पत्रक काढून मुंडे यांच्यावर टीका केली. मागच्या वेळी मुंडे यांनी लिखित जाहीरनाम्यात जिल्हय़ातील रेल्वे प्रश्नापासून अनेक समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले होते. मुंडे यांना लोकसभेत भाजपने उपनेते केल्याने ते पहिल्या रांगेत बसले. मात्र, ५ वर्षांत जिल्हय़ाच्या दृष्टिकोनातून त्यांची कामगिरी निराशाजनक राहिली. केंद्राची कोणतीच योजना त्यांनी आणली नाही. रस्ते विकासासाठी केंद्रीय निधीही मिळवता आला नाही. जाहीरनाम्यातील एकही शब्द पूर्ण केला नाही. जाहीरनाम्यातील ऊसतोड कामगारांच्या मुलांचे वसतिगृह उभारणे हे मुंडेंच्या आवाक्यात होते. तेही झाले नाही. आताही निवडणुकीच्या तोंडावर महायुतीच्या माध्यमातून केलेला महाएल्गार कोणाच्या विरोधात होता, असा प्रश्न करून महाराष्ट्र पेटविण्याची भाषा करणा-यांनी किती गरिबांच्या चुली पेटवल्या, असा सवालही पंडित यांनी केला.