सर्व लहान-मोठय़ा कार्यक्रमाची झोकात प्रसिद्धी करण्यात वाकबगार असलेल्या पालिका प्रशासनाने नागरिकांशी संपर्क साधण्यासाठी सुरू केलेल्या योजना मात्र अत्यंत गुप्त ठेवल्या आहेत. पूर्वीचे संकेतस्थळ व मोबाइल अ‍ॅप गुंडाळून ठेवल्याची माहिती नागरिकांना कळवण्याची तसदी पालिकेने घेतलेली नाहीच शिवाय वीस दिवस उलटल्यावरही नवीन यंत्रणेबाबत पालिकेने कुठेही सूतोवाच केलेले नाही.
नालेसफाईकडे केलेल्या दुर्लक्षामुळे व मुसळधार पावसामुळे शुक्रवारी सर्व शहर ठप्प झाले, तेव्हा शाळा बंद ठेवण्याचा निर्णय लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठीही पालिकेला प्रसारमाध्यमांची निकड भासली. मात्र अद्ययावत संपर्कयंत्रणेसाठी संकेतस्थळ व अ‍ॅपचा पालिकेने केलेला कोणताही वापर नागरिकांपर्यंत पोहोचला नाही. मुंबईच्या पावसाविषयी दर पंधरा मिनिटांनी माहिती अपडेट करणारी मुंबई मान्सून हे संकेतस्थळ तीन वर्षांपूर्वी आणताना तसेच गेल्या वर्षी मोबाइल अ‍ॅप आणताना पालिकेने सातत्याने त्याची प्रसिद्धीपत्रके पाठवली होती. मात्र या दोन्ही यंत्रणा बंद पडल्यावर प्रसिद्धीपत्रक तर नाहीच शिवाय संकेतस्थळावरही कोणत्याही प्रकारचा संदेश दिला गेला नाही. याबाबत पालिकेची तिहेरी संपर्क यंत्रणा अपयशी, ही बातमी छापून आल्यावर, एक जून २०१५ पासून dm.mcgm.gov.in  हे संकेतस्थळ सुरू करण्यात आल्याचा खुलासा पालिकेने केला.
आधीचे संकेतस्थळ केवळ चार महिने असल्याने हे संपूर्ण वर्षांसाठीचे संकेतस्थळ सुरू करण्यात आले असून त्याच्या जोडीने disastermanagementmcgm हे मोबाइल अ‍ॅप अ‍ॅन्ड्रॉइड मोबाइलसाठी असल्याचे पालिकेने सांगितले. मात्र त्याबाबत आतापर्यंत पालिकेकडून एकदाही माहिती दिली गेली नाही. लाखो मुंबईकरांकडे स्मार्ट फोन असताना आतापर्यंत हे मोबाइल अ‍ॅप केवळ २५० लोकांनी डाऊनलोड केले आहे, असे पालिकेच्याच अधिकृत सूत्रांनी सांगितले.
पहिल्याच पावसात नादुरुस्त झालल्या उदंचन केंद्रांच्या उद्घाटनासाठी मोठा समारंभ आयोजित करणाऱ्या पालिकेला नागरिकांच्या हितासाठी सुरू केलेल्या सेवांची माहिती देण्यासाठी प्रसिद्धीपत्रकही काढावेसे वाटले नाही. एवढेच नव्हे तर बंद पडलेल्या संकेतस्थळावर किंवा पालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावरही नवीन संकेतस्थळ व मोबाइल अ‍ॅपचा पत्ता देण्याची काळजीही पालिकेने घेतली नाही.