रस्त्यांची सफाई करणाऱ्या मशीन घोटाळा प्रकरणाचे रोज नवनवे पैलू समोर येऊ लागल्याने महापालिकेत खळबळ उडाली आहे. शहरात अस्तित्वात नसलेल्या चौकांचीही साफसफाई केल्याचे सांगून त्याचे बोगस बिल लाटण्यात आल्याचे आता उघड झाले आहे. याची कागदपत्रे जानेवारीच्या आधीच गहाळ करण्यात आली होती. या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी नियुक्त केलेल्या समितीपुढे सदर बाबी उघडकीस आल्या. महापालिका आयुक्त श्याम वर्धने यांच्याकडे समितीने अहवाल सादर केला आहे. त्यांच्या कक्षात अतिरिक्त आयुक्त हेमंत पवार, अतिरिक्त उपायुक्त रवींद्र कुंभारे यांनी चर्चा केली होती. मात्र, प्रशासनाकडून या चर्चेविषयी गुप्तता पाळण्यात येत आहे.
शहरातील रस्ते साफसफाई करण्याचा ठेका स्वच्छता कंपनीला देण्यात आला. महापलिका पाच वर्षांत ७८ लाख रुपये किंमत असलेल्या रस्ते साफ करणाऱ्या मशीनसाठी साडेसात कोटी रुपये मोजणार आहे. अतिवृष्टी झाल्याच्या काळातही रस्ते साफ करण्यासाठी मशीनचा उपयोग केल्याचे दाखवून बिल लाटण्यात आले. या प्रकरणाची महापालिका आयुक्त श्याम वर्धने यांनी दखल घेऊन हेमंत पवार आणि रवींद्र कुंभारे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या दोन समित्यांनी त्यांचा चौकशी अहवाल आयुक्तांकडे सादर केला आहे.
महापालिकेकडे जानेवारी २०१३ पूर्वीचा अहवाल नसल्याचे निदर्शनात आले. तसेच जे चौक अस्तित्वात नाहीत, अशा चौकांची साफसफाई झाल्याचे दाखवून त्यासंबंधीच्या बिलांना मंजुरी देण्यात आली. यावर कोणाचेच नियंत्रण नसल्याचे समितीला आढळून आले. या मुद्दय़ांवर श्याम वर्धने, हेमंत पवार आणि रवींद्र कुंभारे यांच्यात चर्चा झाली असली तरी त्याबाबत गुप्तता बाळगण्यात आली आहे. सदर प्रकरण आरोग्य व एलबीटी विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अंगाशी येणार असल्याने त्यांची धावाधाव सुरू झाली आहे.
रस्ते सफाई करणारी मशीन शहरात जकात चोरी करून आणण्यात आली असून या मशीनच्या माध्यमातून महापालिकेची लूट सुरू आहे. त्यामुळे कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी महापालिकेतील विरोधी पक्षनेते विकास ठाकरे यांनी केली आहे.