महानगरपालिकेने नागनदी सफाईची मोहीम हाती घेतली असून नागनदीत दूषित पाणी व कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेंतर्गत अंबाझरी तलावाला लागून असलेले पॅराडाईझ नर्सरीला ५ हजार रुपये दंडात्मक कारवाईची नोटीस बजावण्यात आली. पॅराडाईझ नर्सरीतील कचरा नागनदी उगमस्थानाजवळ टाकलेला आढळल्याने पॅराडाईझ नर्सरीचे मालक यांना सक्त ताकीद देऊन ५ हजार रुपये दंड वसुली करण्याकरिता नोटीस देण्यात आल्या. तसेच नागनदी उगमस्थानाजवळ नदीच्या पात्रात व काठावर जनावरांचा गोठा आढळून आला. या गोठय़ाची पाहणी केली असता जनावरांचे मलमूत्र नदीच्या पात्रात सोडत असल्याचे दिसून आले तसेच पात्राच्या कडेला शेणाचा मोठा ढीग आढळून आला. या गोठय़ाचे मालक अमीत यादव यांना सक्त ताकीद देऊन गोठा हलवण्यासाठी नोटीस बजावण्यात आली.
नागनदी ज्या झोन अंतर्गत जाते, त्या सर्व सहा झोनच्या विभागीय अधिकारी व स्वास्थ्य निरीक्षकांना अशा प्रकारे नागनदीच्या पात्रात कचरा टाकणाऱ्या व पाणी प्रदूषित करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याकरिता निर्देश देण्यात आले. ही कारवाई आरोग्य उपसंचालक डॉ. मिलिंद गणवीर यांच्या मार्गदर्शनाखाली, वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक उरकुडे, पशुचिकित्सा अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, विभागीय अधिकारी संजय गोरे, महेश बोकारे, स्वास्थ्य निरीक्षक सूर्यवंशी व सोमकुंवर यांच्याद्वारे करण्यात आली.