शहरातील व्यावसायिक प्रतिष्ठानांना लागणाऱ्या आगींमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी दोन वर्षांपूर्वी महापालिकेच्या अग्निशमन व आणीबाणी सेवा विभागातर्फे सुरू करण्यात आलेली स्वयंचलित अग्निसुरक्षा सूचना प्रणाली कागदावर असल्याची माहिती मिळाली.
शहराचा मोठय़ा प्रमाणात विस्तार होत आहे. बाजारपेठा आणि मॉल्स संस्कृती वाढत आहे. व्यापारी प्रतिष्ठानांची संख्या वाढली आहे. मात्र, त्यांच्यासाठी अग्निशमन विभागातर्फे सुरू करण्यात आलेल्या योजनांची अंमलबजावणी होताना दिसत नाही. उन्हाळ्यामध्ये व्यापारी प्रतिष्ठानांना लागणारी आग विझवण्यासाठी किंवा त्याची तात्काळ माहिती प्रतिष्ठानच्या मालकांना मिळावी या दृष्टीने स्वयंचलित अग्निसुरक्षा प्रणाली सुरू केली होती. महापालिकेच्या केंद्रीय कार्यालयातील अग्निशमन विभागाच्या नियंत्रण कक्षात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते त्या प्रणालीचे लोकार्पण करण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही या योजनेचे काय झाले, असा प्रश्न व्यापारी संघटनातर्फे उपस्थित केला जात आहे. त्यावेळी प्रणालीच्या कार्यपद्धतीची माहिती अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके व ए.आर. कॉमटेली व्हेंचरचे संचालक शेख यांनी सादरीकरणाद्वारे दिली होती. यामुळे या योजनेचा व्यापाऱ्यांना उपयोग होईल असे वाटत असताना गेल्या दोन वषार्ंपासून काहीच कार्यवाही करण्यात आलेली नसल्याचे दिसून येत आहे.
या प्रणालीच्या माध्यमातून शहरातील हजारो व्यावसायिक प्रतिष्ठाने या प्रणालीमुळे अग्निशमन नियंत्रण कक्षाशी थेट जोडण्यात येणार आहेत. त्यामुळे रात्री अपरात्री प्रतिष्ठाने बंद झाल्यावर आग लागताच अग्निशमन विभागातील नियंत्रण कक्षाला त्याची सूचना मिळणार आहे. तसेच प्रतिष्ठान मालकालाही त्याच्या मोबाईलद्वारे आग लागल्याचे कळणार आहे. आगीने उग्र स्वरूप धारण करण्यापूर्वीच त्यावर नियंत्रण मिळवणे या प्रणालीद्वारे शक्य होणार होते. तसेच आगीमुळे आर्थिक व जीवित हानी कमी होण्यास मदत होणार होती. नियंत्रण कक्षाला जोडण्यासाठी स्वयंचलित अग्निसुरक्षा सूचना उपकरण डिटेक्टर सिस्टमसह प्रतिष्ठानांना प्रणालीत लावणे आवश्यक आहे. मोबाईल सीमकार्डवरून ही प्रणाली संचालित होणार होती. मात्र,  याबाबत पुढे काहीच झाले नाही आणि स्वयंचलित अग्निसुरक्षा सूचना प्रणाली आज केवळ कागदावर आहे.
महापालिकेतर्फे अनेक योजना राबविल्या जात असल्या तरी प्रशासन मात्र गंभीर नाही. शहरातील उंच इमारतीला आग लागली की ती विझवण्यासाठी टीटीएल मशीनची आवश्यकता असताना याबाबत महापालिका प्रशासनाकडून कुठलीच कारवाई करण्यात आलेली नाही. आतापर्यंत चारवेळा निविदा काढण्यात आल्या. पाचव्यादा पुन्हा निविदा काढण्यात येणार आहे. या संदर्भात अग्निशमन विभागाचे सभापती किशोर डोरले विचारणा केली असताना त्यांनी स्वयंचलित अग्निशमन सूचना प्रणालीची माहिती घ्यावी लागणार असल्याचे सांगितले.