कुस्ती स्पर्धा, नगरसेवकांचे महोत्सव, उद्घाटने, पाटय़ा, कमानी या आणि अशासारख्या अनेक गोष्टींवर कोटय़वधी रुपयांची उधळपट्टी करणाऱ्या पुणे महापालिकेने शहरात पोलिओ लसीकरणाची मोहीम राबणाऱ्या एक हजार सेविकांना मानधन देण्यात मात्र कंजूषपणा दाखला आहे. अगदी अल्प रकमेसाठी या सेविकांना फसवण्याचा प्रकार गेली पाच वर्षे सुरू आहे.
दरवर्षी शहरात जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात शून्य ते पाच या वयोगटातील बालकांसाठी पोलिओ लसीकरणाची मोहीम राबवली जाते. महापालिका हद्दीमध्ये अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस मिळून एक हजार महिलांमार्फत हे काम करून घेतले जाते. या हजार जणींकडून दरवर्षी होणाऱ्या प्रामाणिक प्रयत्नांमुळेच शहरात ही मोहीम दरवर्षी यशस्वी होते.
राज्य शासनाकडून अंगणवाडी सेविकांना पोलिओ मोहिमेचे मानधन म्हणून २००८ साली २५ रुपये दिले जात असत. सेविकांच्या या कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेने त्यांच्या मानधनात स्वत:चा हिस्सा मिसळून ही रक्कम शंभर रुपये करावी, असा निर्णय मुख्य सभेने त्याच वर्षी घेतला. मात्र, पुढे दोन वर्षे हे प्रकरण फक्त विविध खात्यांमधून फिरत राहिले. सर्व सोपस्कार पूर्ण होऊन महापालिकेने सेविकांना वाढीव मानधन द्यावे, असा अंतिम निर्णय सन २०१० मध्ये झाला. मात्र, तसा निर्णय होऊन देखील २००८ सालातील हे अल्पसे वाढीव मानधन सेविकांना आजतागायत मिळाले नसल्याची तक्रार अंगणवाडी कर्मचारी सभेचे प्रदेश उपाध्यक्ष नितीन पवार यांनी गुरुवारी केली. मोहीम राबवण्यासाठी अंगणवाडी सेविकांना हक्काने काम दिले जाते आणि मानधन देण्याची वेळ आली की अडवणूक सुरू होते, अशीही तक्रार त्यांनी केली.
सातत्याने पाठपुरावा करूनही २००८ मधील फरकाची रक्कम अद्याप देण्यात आलेली नाही. त्यामुळे त्या पुढील वर्षांतही अशी रक्कम देण्याचा प्रश्नच उद्भवला नाही. यंदा राज्य शासनाने वर्षांतील दहा दिवसांच्या मोहिमेसाठी सेविकांना प्रतिदिन ७५ रुपये मानधन दिले आहे. त्यामुळे महापालिकेने फक्त २५ रुपयांची भर घालण्याचा प्रश्न आहे. महापालिकेला वर्षांला पाच लाख रुपयांचाच हिस्सा उचलावा लागणार आहे. तरीही ती रक्कम देण्याबाबत प्रशासन वा लोकप्रतिनिधी आस्था दाखवत नाहीत ही वस्तुस्थिती आहे.
कर्तव्य पार पाडून निषेध करणार
महापालिकेकडून मिळणारे थकीत मानधन मिळावे या मागणीसाठी अंगणवाडी सेविकांनी यंदाच्या मोहिमेवर बहिष्काराचा निर्णय घेतला होता. मात्र, तो निर्णय मागे घेण्यात आला असून पोलिओ मोहिमेतील कर्तव्य बजावून तसेच काळ्या फिती लावून सेविका महापालिकेचा निषेध करणार आहेत. तसेच २० जानेवारी रोजी या प्रकाराच्या निषेधार्थ संघटनेचे कार्यकर्ते महापालिकेसमोर लाक्षणिक उपोषणही करणार आहेत.