तावडे हॉटेल परिसरात विनापरवाना बांधण्यात आलेल्या घरकुलांचा विषय तापू लागल्यावर शुक्रवारी महापालिकेतील अधिकारी-पदाधिकाऱ्यांना जाग आली. महापालिका आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी, उपायुक्त संजय हेरवाडे, स्थायी समिती सभापती राजू लाटकर यांच्यासह अधिकारी, नगरसेवकांनी जागेची पाहणी केली. महापालिकेकडे उपलब्ध असलेल्या कागदपत्रांच्या आधारे महापालिका हद्दीतील जागेचे रेखांकन करावे, अशा सूचना आयुक्तांनी नगरअभियंता नेत्रदीप सरनोबत यांना दिले.    
तावडे हॉटेल ते गांधीनगर मार्गावरील जागा कोणाच्या मालकीची यावरून नव्या वादाने डोके वर काढले आहे. उचगाव ग्रामपंचायतीने ही जागा आपलीच आहे, असा दावा केला आहे. तर महापालिकेने जागा आपल्या हद्दीत येत असल्याचे नमूद करीत या भागात उभारण्यात आलेल्या ४० मिळकती विनापरवाना, अनधिकृत ठरवून ती काढून टाकण्याची नोटीस बजावली आहे. दोन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वादामुळे मिळकतधारक मात्र पेचात सापडले आहेत. हा वाद दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. त्याची दखल घेत शुक्रवारी आयुक्त बिदरी, उपायुक्त हेरवाडे, स्थायी समिती सभापती लाटकर यांच्यासह नगरसेवक व अधिकाऱ्यांनी जागेची पाहणी केली. तेथील नागरिकांशी चर्चा करण्यात आली. जागा महापालिका हद्दीत आहे हे स्पष्ट होण्याची गरज नगरसेवकांनी व्यक्त केली. त्यावर महापालिका हद्द असलेल्या भागाचे रेखांकन करून घेण्यात यावे, असे आदेश आयुक्तांनी दिले.