शहरातील अनेक भागात पाणी नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत असल्याचे चित्र अधिक अधिक गडद झाले असतानाच मनपाच्या मुख्यालयातही असेच चित्र बघायला मिळाले तर यावर विश्वास बसणार नाही; परंतु शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मनपाच्या मुख्यालयातीलच कर्मचाऱ्यांना पाण्यासाठी भटकावे लागत आहे. मंगळवारी दुपारी मनपाच्या कार्यालयाच्या नळाला पाणी नसल्याने पाण्यासाठी हातात पाण्याची बादली घेऊन आयुक्त कार्यालयातील कर्मचारी पाण्यासाठी एका कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयात वणवण भटकत असल्याचे चित्र बघायला मिळाले.
पाणीपुरवठा शहराला करण्याची जबाबदारी मनपाची आहे. कन्हान व गोरेवाडा येथून शहराला  रोज ६४० एमएलडी पाण्याचा पुरवठा होतो, अशी मनपाच्या दरबारी नोंद आहे. शहरवासीयांना जर का पाणी मिळाले नाहीतर मनपाकडे तक्रार घेऊन येतात. संबंधित अधिकारी व यंत्रणेला आयुक्त, महापौर तक्रारींची दखल घेऊन निर्देश देऊन नागरिकांची पाणी समस्या दूर करतात. पाणी वितरण व व्यवस्थेचे खाजगीकरण मनपाने करून ओसीडब्ल्यू या कंपनीकडे याचे काम दिले आहे. पाणीपुरवठय़ाची जबाबदारी वर्षभरापासून ओसीडब्ल्यू कंपनीकडे आहे. संपर्ण शहरात २४ तास सातही दिवस नळाला पाणी योजना प्रकल्प जेएनएनयूआरएम अंतर्गत मिळालेल्या निधीतून राबविल्या जात आहे.
 भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांचे शहरवासीयांना २४ तास पाणी देणे हे स्वप्न होते. मनपात भाजपप्रणीत शहर विकास आघाडीची सत्ता असून देखील मनपातील कर्मचाऱ्यांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. आयुक्त कार्यालयालया पाण्याची गरज भासली त्यसाठी कर्मचारी हातात बादली घेऊन दुसऱ्या कार्यालयात फिरत  होते.  ही एक शोकांतिकाच म्हणावी लागेल.