नागरिकांना स्वच्छतेचे धडे देणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या जी-दक्षिण विभागातील ‘सीताराम मिल कंपाऊंड’ येथील शाळेमध्ये विद्यार्थी तसेच शिक्षक-कर्मचाऱ्यांकरिता असलेल्या स्वच्छतागृहांची मात्र कमालीची दूरवस्था झाली आहे. वर पालिकेची मग्रुरी अशी की ही बाब उघडकीस येण्यास कारणीभूत ठरल्याचे कारण दाखवत शाळेच्या रखवालदाराला निलंबित करण्यात आले आहे.
४३०च्या वर विद्यार्थी या शाळेत शिकतात. पण, स्वच्छतागृहेच नव्हे तर शाळेची संपूर्ण इमारतच दुरुस्तीअभावी मोडकळीला आली असल्याची पालकांची तक्रार आहे. काही काही ठिकाणी शाळेचे छप्पर कधीही कोसळू शकते. त्यामुळे, आपले मूल शाळेत असेपर्यंत पालकांच्या जीवाला घोर असतो. शाळेची स्वच्छतागृहे तर इतकी घाणेरडी आहेत की विद्यार्थी-विद्यार्थिनी तेथे जाण्याचेही टाळतात. काही मुली तर शाळा सुरू असेपर्यंत गरज लागली तरी स्वच्छतागृहात जात नाहीत. आपल्या नैसर्गिक विधींकरिता मुलींना घर गाठण्याशिवाय पर्याय नसतो, अशी तक्रार एका पालकाने नाव न छापण्याच्या अटीवर केली.
१६ जूनला शाळा सुरू होण्याच्या चार दिवस आधी स्वच्छता करणाऱ्या कामगारांवर शाळेचे छप्पर कोसळले होते. सुदैवाने यात कुणी जखमी झाले नाही. परंतु, या प्रकाराची दखल घेऊन शाळा दुरुस्तीच्या कामाला अद्याप सुरुवात झालेली नाही. या सर्व प्रकाराची पालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही त्याची दखल घेतली गेलेली नाही.
चोर सोडून संन्याशाला फाशी
या शाळेची दूरवस्था चव्हाटय़ावर आणण्याचे काम या पूर्वीही एका मराठी वृत्तवाहिनीने केले होते. शाळेच्या परिसरात फिरून, शूटिंग करून वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीने आणि कॅमेरामॅनने ही बातमी प्रदर्शित केली होती. पण, पालिकेने या वृत्ताची दखल घेऊन शाळेच्या इमारतीची आणि स्वच्छतागृहांची अवस्था सुधारण्याऐवजी संबंधित वृत्त प्रतिनिधी आणि कॅमेरामनला शाळेच्या आवारात प्रवेश का दिला म्हणून शाळेचे रखवालदार आणि माळी असलेल्या आपल्या कर्मचाऱ्यालाच निलंबित केले आहे. या प्रतिनिधीला अटकाव केला नाही म्हणून शाळेचे रखवालदार मनिष जाधव यांचे कृत्य ‘गैरशिस्तीचे, बेजबाबदारपणाचे व कामातील दिरंगाईचे’ ठरविण्यात आले आहे. पण, आपल्या कर्मचाऱ्यावर कारवाईचा बडगा उगारणाऱ्या पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची तसेच मुख्याध्यापकांची शाळेची इमारत दुरूस्त करून घेणे वा तेथील स्वच्छतागृहे विद्यार्थ्यांना वापरता येतील इतपत स्वच्छ ठेवणे ही जबाबदारी ठरत नाही का? मग आपल्या कामात कसूर करणाऱ्या आणि आमच्या मुलांच्या जीवाशी खेळणाऱ्या पालिकेच्या अधिकाऱ्यांवर आतापर्यंत का कारवाई झाली नाही, अशा सवाल पालक करीत आहेत. शाळेतील काही स्वच्छतागृहांची अवस्था वाईट आहे. मात्र, शाळेत इतरही चांगली स्वच्छतागृहे आहेत. मुलांनी त्याचा वापर करावा. तसेच, या इमारतीच्या दुरुस्तीचे कामही आम्ही सुरू केले आहे. सबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई होणार नाही, याचीही काळजी आम्ही घेऊ.
– विनोद शेलार,
अध्यक्ष,पालिका शिक्षण समिती