शहरातील सार्वजनिक जागांवर मोठय़ा प्रमाणात धार्मिक अतिक्रमणे झाली असून त्यापैकी अनेक जागा वारसा स्थळांच्या यादीत असल्याने अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात नासुप्र आणि महापालिकेची यंत्रणा आढेवेढे घेत आहे. यातील काही अतिक्रमणे नियमित करण्याची शिफारस संबंधित यंत्रणांनी केली असली तरी त्याबाबतही निर्णयाचे भिजत घोंगडे पडून असल्याने या अडलेल्या जागा मोकळ्या केव्हा होतील, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
अनधिकृत धार्मिक स्थळे हटवताना धार्मिक भावनांचा प्रश्न आड येत असल्यामुळे इतर अतिक्रमणांप्रमाणे त्यांचा विचार होत नाही. मात्र ही अतिक्रमणे का हटत नाहीत, यामागची वैशिष्टय़पूर्ण कारणे आता स्पष्ट होऊ लागली आहेत. धार्मिक अतिक्रमणे पाडणे, स्थलांतरित करणे किंवा नियमित करणे अशा तीन प्रकारे ती निकाली काढण्याबाबत निर्णय घेतला जातो. याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिशानिर्देशही दिले आहेत. त्यानुसार राज्य सरकारने जिल्हास्तरीय आणि महानगरपालिका स्तरीय समित्या नेमल्या आहेत. धार्मिक अतिक्रमणांबाबत त्याच निर्णय घेतात.
नागपूर महापालिकेच्या सर्वच विभागांमध्ये (झोन) धार्मिक अतिक्रमणे आहेत. त्यातही धंतोली विभागातील अतिक्रमणांचे वेगळे वैशिष्टय़ आहे. या विभागात ‘अ’ वर्गातील ६८ आणि ‘ब’ वर्गातील २३० अशी एकूण २६८ अनधिकृत धार्मिक स्थळे आहेत. मात्र यापैकी बहुतांश १०० वर्षांहून जुनी असल्यामुळे ती वारसा स्थळांच्या यादीत (हेरिटेज लिस्ट) आहेत. त्यामुळे ती हटवण्यात मोठी अडचण आहे. धंतोली विभागात एकटय़ा संगम चाळीनजीक नागनदीच्या काठावर भोलेनाथ, श्रीकृष्ण, गणेश, शिवनाथ, बजरंगबली, दत्त, ओम नम: शिवाय, हनुमान, मुरलीधर, शिवलिंग अशी विविध मंदिरे आहेत. ही जमीन ज्यांच्या अखत्यारितील आहे तो विभाग, नियोजन प्राधिकरण आणि संबंधित पोलीस ठाणे या सर्वानी अभिप्राय देताना ही मंदिरे नागनदी काठावर ‘ब्ल्यू झोन’मध्ये असल्याचे मान्य केले आहे. परंतु, ती वारसा स्थळांच्या यादीत असल्याने, तसेच त्यांना ‘व्यापक लोकमान्यता’ असल्याने ती नियमित करण्यास हरकत नाही, असे सांगितले आहे. अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकाराखाली केलेल्या विचारणेत महापालिकेने ही माहितीीदली आहे.
याशिवाय टेकडी रोडनजिक मुंडा मंदिर, लोखंडी पुलाजवळ शनिमंदिर, येथेच मारुती-गणपती मंदिर, नवी शुक्रवारी येथील काशीबाई मंदिर ही मंदिरे त्या मानाने नवी, म्हणजे सुमारे ४० ते ५० वर्षांपूर्वीची आहेत. वंजारीनगर येथील दर्गाही अंदाजे ४० वर्षांपूर्वीचा आहे.
मात्र ही धार्मिक स्थळे प्राचीन असून लोकांचे श्रद्धास्थान आहेत. शिवाय काही वारसा स्थळांच्या यादीत असल्याने त्यांनाही नियमित करावे, असा अभिप्राय संबंधितांनी नोंदवला आहे. मात्र ती नियमित करण्याबाबतही सक्षम अधिकाऱ्यांनी टाळाटाळ चालवली आहे. त्यामुळे अनधिकृत असली तरी ही धार्मिक ठिकाणे हटवलीही जात नाहीत आणि नियमितही होत नाहीत अशी त्यांची स्थिती झालेली आहे.