अतिक्रमण काढण्याच्या कारणावरून माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक गणेश लुंगे यांनी पालिकेचे क्षेत्रीय अधिकारी डी. पी. शिंदे यांना शिवीगाळ करून धमकी दिली. या प्रकाराच्या निषेधार्थ पालिका कर्मचाऱ्यांनी गुरुवारी काम बंद आंदोलन सुरू करून लुंगे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली.
नगर परिषद कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा प्रशासन, नगराध्यक्षांसह संबंधितांना यासंदर्भात निवेदन दिले. त्यात म्हटले आहे, की नगरपालिका झोन क्र.२चे क्षेत्रीय अधिकारी डी. पी. शिंदे हे तीन दिवसांपूर्वी जि.प. परिसरातील श्याम पहेलवान यांचे अतिक्रमण काढत होते. त्या वेळी लुंगे यांनी मोबाइलवर शिंदेंना शिवीगाळ करून अतिक्रमण काढाल तर खबरदार, अशी धमकी दिली. कर्मचाऱ्यांनी या घटनेची तक्रार मुख्याधिकारी भारत राठोड यांना लेखी देऊन संबंधित सदस्यावर कारवाईची मागणी केली. परंतु पालिका प्रशासनाने तक्रारीची दखल न घेतल्याने कर्मचाऱ्यांनी गुरुवारपासून काम बंद आंदोलन सुरू केले. सफाई कामगार, पाणीपुरवठा, विद्युत व अन्य अशा दीडशे कर्मचारी संपात सहभागी झाल्याची माहिती कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष विश्वनाथ घुगे यांनी दिली.