‘खासदार मी होणार’ असे म्हणत लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेले भीमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष मुन्ना उर्फ धनंजय महाडिक यांची दिल्लीवारी राजकीय पटलावर संभ्रमात टाकणारी बनली आहे. काका आमदार महादेवराव महाडिक यांच्या समवेत धनंजय यांनी काँग्रेस पक्षश्रेष्ठींची भेट घेतल्याने त्यांच्या उमेदवारीविषयीचा गोंधळ आणखीनच वाढला आहे. एकीकडे कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांच्यामार्फत राष्ट्रवादीची उमेदवारी मिळविण्याचा प्रयत्न सुरू असताना शिवसेनेची उमेदवारी स्वीकारण्याची तयारीही ते दर्शवित आहेत. कदाचित कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ घडय़ाळाकडून हाताकडे आला तर ऐनवेळी अडचण नको, म्हणून हातात-हात घालण्याची खेळी त्यांनी दिल्लीवारीव्दारे खेळली आहे. शिवाय स्वाभिमानीचेही वावडे नसल्याचे सांगणाऱ्या मुन्ना महाडिक यांच्या हाती नेमके कोणते चिन्ह येणार हे स्पष्ट होण्याऐवजी संभ्रमाचे वातावरण अधिकच गहिरे बनत चालले आहे.     
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात सध्या अपक्ष म्हणून निवडून आलेले खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या हाती खासदारकीची सूत्रे आहेत. प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते पुन्हा रिंगणात उतरण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे राष्ट्रवादीकडून लोकसभेच्या रिंगणात कोण उतरणार याचा शोध सुरू झाला. कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांचे नाव पुढे येऊ लागल्याची चर्चा जोर धरू लागल्यावर त्यांनी धनंजय महाडिक हा दमदार मोहरा हाती धरला. गेल्या लोकसभा निवडणुकीत फसगत झालेले धनंजय महाडिक यांनी पुढच्या निवडणुकीत कसेही करून यश मिळवायचेच असा निर्धार केला. धनंजय महाडिक युवा शक्तीच्या माध्यमातून अनेकविध सामाजिक कार्याची मालिकाच चालवित आपले नाव प्रकाशझोतात ठेवण्याचे नेटके प्रयत्न त्यांनी केले. शिवाय मुश्रीफ यांच्यासारख्या वजनदार मंत्र्याचे पाठबळ मिळाल्याने धनंजय महाडिक यांचे नाव आणखीनच चर्चेत आले. कोल्हापूर मतदारसंघ राष्ट्रवादीकडे असल्याने आणि पक्षात मुश्रीफ स्थान भक्कम असल्याने मुन्ना महाडिक यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली गेली.     
राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून महाडिक चर्चेत असताना शिवसेनेच्या गोटातूनही त्यांच्या नावाची चर्चा होऊ लागली. महाडिक यांच्या हाती धनुष्यबाण देऊन लोकसभेचा फड जिंकण्याची भाषा शिवसेनेतून ऐकू येऊ लागली. तथापि शिवसेनेतच उमेदवारीवरून दुफळी निर्माण झाली आहे. आमदार राजेश क्षीरसागर आणि जिल्हाप्रमुख संजय पवार, जिल्हाप्रमुख विजय देवणे यांच्यात टोकाचे मतभेद निर्माण झाले आहेत. संजय पवार यांनी देवणेंसाठी मोर्चेबांधणी चालविली असून देवणे जिल्ह्य़ाच्या दक्षिण भागात तळ ठोकून आहेत. अशा स्थितीत शिवसेनेच्या उमेदवारीची माळ धनंजय महाडिक यांच्या गळ्यात कितपत पडणार याबद्दल तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत.    
राष्ट्रवादी व शिवसेनेतील उमेदवारीचा संभ्रम महाडिकांच्या लक्षात आला असावा. खेरीज, कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ काँग्रेस पक्षाकडे द्यावा असा मतप्रवाह जिल्ह्य़ातील नेत्यांकडून वाढीस लागला आहे. जिल्हा काँग्रेसमध्ये अलीकडेच झालेल्या मेळाव्यात हीच भाषा उच्चारवाने चर्चिली. परिस्थितीचा बदलता कानोसा लक्षात घेऊन महादेवराव महाडिक व धनंजय महाडिक या काका-पुतण्यानी काँग्रेसची उमेदवारी आपल्या हाती रहावी, असा प्रयत्न चालविला आहे. याच हेतूने त्यांनी दिल्लीवारी केली आहे.    
वरकरणी साखर कारखाना, सहकारातील कामांचा पाठपुरावा करण्यासाठी नवी दिल्लीला गेल्याचे त्यांच्याकडून सांगितले जात आहे. प्रत्यक्षात काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश व प्रवक्ते दिग्विजय सिंह यांची तेथे भेट घेतली. त्यांना आपली राजकीय पाश्र्वभूमी विशद करतांनाच लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीचा मनसुबाही स्पष्ट केल्याचे सांगितले जात आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ काँग्रेस पक्षाकडे आल्यास त्याची उमेदवारी घेण्याचीही कोणाची फारशी तयारी दिसत नाही. गृहराज्यमंत्री सतेज पाटील व जिल्हाध्यक्ष माजी आमदार पी.एन.पाटील यांनी एकमेकांकडे बोट दाखवून आपली विधानसभेची जागा मजबूत ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. दोघा पाटलांना दिल्ली ऐवजी मुंबईतच रस आहे. अशास्थितीत उमेदवारीची पोकळी भरून काढण्याचे काम धनंजय महाडिक करू शकतात. मात्र महाडिक यांच्याकडे उमेदवारी आली तर त्यांना सतेज पाटील गटाकडून कितपत सहकार्य होणार हाही महत्त्वाचा प्रश्न आहे.