गेल्या चार महिन्यांपासून नवी मुंबईतील सायबर सिटीमध्ये दहावी पास झालेला एक तरुण एमडी पॅथॉलॉजिकल डॉक्टर असल्याची पदवी लावून प्रयोगशाळा चालवीत होता. या प्रयोगशाळेतून हजारो रुग्णांना रक्ताच्या नमुन्यांचे अहवाल देण्यात आले आहेत. या तरुणाला खारघर पोलिसांनी अटक केली आहे. या तरुणाचे नाव जितेंद्र बंडू भोसले असे आहे. या अगोदर जानेवारी महिन्यात पनवेलमध्येही अभिजीत हावळे याने नांदेडचे डॉ. प्रमोद राठोड यांचे नाव वापरून आणि स्वाक्षरी करून रुग्णांचे रक्त नमुने घेऊन त्यांना अहवाल देत असताना पोलिसांनी रंगेहाथ पकडले होते. पनवेलमध्ये वाढत्या बोगस पॅथॉलॉजिकलचा व्यवसायामुळे वैद्यकीय क्षेत्राच्या विश्वासार्हतेवर संशयाचे धुके पसरले आहे. खारघर येथील गोखले विद्यालयाशेजारील सेक्टर १२ येथे फोनिक्स पॅथ्लॉजी लॅबोरेटरी नावाने जितेंद्र प्रयोगशाळा चालवीत होता.
याअगोदर जितेंद्रची सोलापूरमध्ये प्रयोगशाळा होती. प्रयोगशाळा उघडण्यासाठी कोणत्याही सरकारी प्रशासनाची मंजुरी लागत नसल्याने पनवेल, नवी मुंबई राहणाऱ्या सदन नागरिकांमुळे हा परिसर वैद्यकीय क्षेत्रासाठी सोन्याची अंडी देणारी कोंबडी बनला आहे. यामुळेच जितेंद्रने आपले बस्तान खारघरमध्ये मांडले. पनवेल पोलिसांनी हावळे प्रकरणानंतर पनवेलमध्ये ५० हून अधिक वैद्यकीय चाचण्या करणाऱ्या प्रयोगशाळा एमडी, एमबीबीएस (पॅथॉलॉजिकल) यांच्या व्यतिरिक्त चालविल्या जातात अशी गोपनीय माहिती उजेडात आणली होती. आरोग्य विभागाचे या व्यवसायावर कोणतेही नियंत्रण नसल्याने तेरी भी चूप और मेरी भी..या उक्तीप्रमाणे हा व्यवसाय येथे सुरू आहे. जितेंद्रच्या प्रयोगशाळेत पोलिसांना जितेंद्रच्या नावाने एमबीबीएस आणि एमडी पदवी संपादन केलेली प्रमाणपत्रे पाहायला मिळाली. खारघर शहरातील इतर प्रयोगशाळा मालकांच्या स्पर्धेत जितेंद्रने अल्पवेळेत रुग्णांना आपल्याकडे आकर्षित केल्याने सर्वाचे लक्ष जितेंद्रकडे वेधले होते. प्रयोगशाळेमध्ये एमडी व एमबीबीएस पदवी संपादन केलेल्या डॉकटरांच्या संघटनेने जितेंद्रला पकडून दिल्याचे बोलले जात आहे. कोणते डॉक्टर आपले रुग्ण जितेंद्रच्या प्रयोगशाळेत पाठवीत होते, त्याबद्दल पोलिसांचा तपास सुरू आहे.