शहरातील गंगापूर रोड या उच्चभ्रू वसाहतीत पती-पत्नीमध्ये झालेल्या भांडणात गळा दाबून पत्नीचा खून करण्यात आल्याची घटना घडली. या घटनाक्रमानंतर संशयिताने पत्नीच्या आत्महत्येचा बनाव रचत पलायन केले. या प्रकरणी संशयित पती व सासऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. गंगापूर रस्त्यावरील रामेश्वर कॉलनीत वास्तव्यास असलेल्या पियुष पाटील यांचा विवाह गेल्या वर्षी जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथील प्रा. वसंत पाटील यांची कन्या स्वाती उर्फ अनुजा हिच्याशी थाटामाटात झाला होता. लग्नानंतर काही दिवसात तिला माहेरून पैसे आणले नाही म्हणून सासरच्या मंडळींकडून शारीरिक व मानसिक त्रास देण्यास सुरूवात झाली. माहेरच्या लोकांशी बोलण्यास तिला मनाई करण्यात आली. दिवसागणिक छळात भर पडत असल्याची तक्रार अनुजा यांनी पालकांकडे केली होती. सोमवारी सायंकाळी माहेरून पैसे आणले नाही म्हणून संतापलेल्या पियुषने पत्नीचा गळा दाबला. मात्र तिने आत्महत्या केल्याचा बनाव रचून पळ काढला. दरम्यान, या घटनेची माहिती माहेरच्या मंडळींना मिळताच त्यांनी नाशिकला धाव घेतली. घरातील सामानाची नासधूस, तोडफोड करत जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही, तोवर मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा घेतला. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. या प्रकरणी पियुष पाटील, सासु शुभांगी पाटील, सासरे निवृत्ती पाटील यांच्याविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 1, 2015 8:03 am