सीबीडी बेलापूर रेल्वेस्थानक परिसरात अनोळखी इसमाचे अवयव विविध ठिकाणी तुकडय़ांच्या स्वरूपात फेकून दिल्याचे आढळून आले होते. अकरा दिवसांनतर या हत्येचा उलगडा झाला असून कार्तिक जयस्वाल हा सफाई कामगार आपल्या अन्य सहकाऱ्यांना त्रास देत असल्याने त्याची हत्या करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. सीबीडी रेल्वे स्थानकात सफाईचे काम करणाऱ्या कामगारांपैकी तो होता. सतत मद्यप्राशन करून येत असल्याने कार्तिकला कामावरून काढून टाकण्यात आले होते. मात्र याचा राग तो अन्य कामगारांना त्रास देऊन काढत असल्याने कार्तिकचा काटा काढण्याचा कट या सीबीडी रेल्वेस्थानाकातील सफाई कामगारांनी केला. या प्रकरणी पोलिसांनी सत्यनारायण यादव आणि विकास यादव दोन आरोपींना अटक केली असून अन्य दोन आरोपींचा पोलीस शोध घेत असल्याची माहिती गुन्हे पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे यांनी दिली आहे.