उरण तालुक्यातील चिरनेरच्या जंगलात रविवारी मानवी शरीराचे अवशेष सापडले आहेत. या संदर्भात आलेल्या तक्रारीवरून उरण पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. मात्र मृतदेहाशेजारी आढळलेल्या संशयास्पद वस्तूंमुळे मृत व्यक्तीचा नरबळी देण्यात आलेला आहे की त्याची हत्या झाली आहे. हे निश्चित झाले नसून पोलिसांनी नरबळी असल्याचा दावा पूर्णपणे फेटाळलेला आहे. याचा निष्कर्ष तपासाअंतीच लागेल, असेही पोलिसांचे म्हणणे आहे.
उरण (चिरनेर) ते पेण-पनवेलला जोडणाऱ्या रस्त्यालगत इंद्रायणी डोंगरा आहे. या डोंगरावरील मंदिराच्या रस्त्यातील मध्यावरील आड फाटय़ातील जंगलात मानवी शरीराची लांब केस असलेली कवटी, हाताची हाडे आदी अवशेष आढळून आले आहेत. या अवशेषांवरून प्रथमदर्शनी ती महिला असल्याचा संशय आहे. तर मृतदेहाची कवटी अर्धवट जळाल्याने मृतदेह जाळण्याचा प्रयत्न झाला आहे का असाही संशय व्यक्त केला जात आहे. इतर अवयव व अंगावरील कपडे का जळले नाहीत, असा प्रश्नही निर्माण झाला आहे. त्याचप्रमाणे मृतदेहाशेजारी लिंबू आणि अगरबत्तीही, हळद, कुंकू, कवटी जाळण्यासाठी आणण्यात आलेल्या गवऱ्या आढळल्याने नरबळी दिला असल्याचाही संशय व्यक्त केला जात आहे. मृत व्यक्तीची लेडीज पर्स घटनास्थळी सापडली असून या पर्समध्ये कपडे, मेकअप तसेच टूथपेस्ट इत्यादी सामान असल्याने महिलेला कोणी तरी फसवूणक आणून मारून टाकले असावे, असाही कयास लावला जात असल्याने नक्की कारण का, हे समजण्यासाठी या परिसरातील आदिवासींकडे पोलिसांनी विचारणा सुरू केली आहे.
त्यानुसार एका आदिवासीने महिलेचा मृतदेह काही दिवसांपूर्वी पाहिल्याचेही बोलले जात आहे. या संदर्भात उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र गलांडे यांच्याशी संपर्क साधला असता चिरनेरमध्ये मानवी अवशेष आढळलेले आहेत. त्याचा तपास सुरू असून नरबळी, हत्या की मृत्यूचे इतर कोणते कारण या तिन्ही गोष्टींची शक्यता पडताळून पाहिली जात आहे. त्या दिशेने पोलीस अधिक तपास करीत असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.