06 August 2020

News Flash

शेतजमिनीच्या वादातून वृद्धाचा खून

शेतजमिनीच्या भाऊबंदकीच्या वादातून एका वृद्ध व्यक्तीचा खून करण्याचा प्रकार मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडला. पुनाळ (ता.पन्हाळा) येथे चुलत भावांकडून झालेल्या हल्ल्यामध्ये आनंदा गणपती पाटील (वय ७२)

| January 9, 2013 07:39 am

शेतजमिनीच्या भाऊबंदकीच्या वादातून एका वृद्ध व्यक्तीचा खून करण्याचा प्रकार मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडला. पुनाळ (ता.पन्हाळा) येथे चुलत भावांकडून झालेल्या हल्ल्यामध्ये आनंदा गणपती पाटील (वय ७२) या व्यक्तीचा मृत्यू झाला. याप्रकरणी पन्हाळा पोलिसांनी आनंदी भिवा पाटील (वय ६०), तानाजी भिवा पाटील (वय ३०) व तुकाराम गोपाळ पाटील (वय ५५) या तिघांना अटक करण्यात आलेली आहे. पुनाळ या गावी आनंदा पाटील व त्यांचे चार सख्खे भाऊ एकत्रित शेती करतात. आनंदा पाटील यांना चार चुलत भाऊही आहेत. या सर्वाची एकत्रित शेती आहे. शेतीची मालकी कोणाची यावरून पाटील कुटुंबात भाऊबंदकीचा वाद गेली २८ वर्षे आहे. याच मुद्यावरून दोन्ही कुटुंबात अनेकदा मारहाणीचे प्रसंग घडलेले आहेत. त्यावर तोडगा काढण्याचे प्रयत्न निष्फळ ठरले.
    आनंदा पाटील यांच्या शेतामध्ये उसाची पेरणी करण्यात आली होती. शेतातील ऊस नुकताच साखर कारखान्याला गाळपासाठी पाठविण्यात आला आहे. मात्र कारखान्याला ऊस पाठविताना त्याची माहिती चुलत भावांना दिलेली नव्हती. त्यामुळे चुलत भावांमध्ये वाद धुमसत होता. त्याचे पडसाद मंगळवारी रात्री उशिरा उमटले.
    आनंदा पाटील व त्यांचे कुटुंबीय काल रात्री जेवण करून झोपण्याच्या मन:स्थितीत होते. याचवेळी त्यांचे चार चुलत भाऊ, त्यांची मुले, महिला यांनी आनंदा पाटील यांच्या घरात प्रवेश केला. त्यांना परस्पर कारखान्याला ऊस का पाठविला यावरून वाद घालण्यास सुरुवात केली. त्यावरून दोन्ही कुटुंबांत जोरदार वादास सुरुवात झाली. वादाचे पर्यावसन मारामारीत झाले. दोन्ही गटाकडून एकमेकांना प्रत्युत्तर देण्यातून जोरदार मारहाण सुरू झाली. या मारहाणीमध्ये आनंदा पाटील यांच्या पायावर व शरीराच्या अन्य भागांवर कुऱ्हाडीने जोरदार घाव घालण्यात आले. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास त्यांना कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी जाहीर केले. याप्रकरणी पन्हाळा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला असून उपरोक्त तिघांना अटक करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 9, 2013 7:39 am

Web Title: murder of aged in dispute of farmland
Next Stories
1 सार्वजनिक वितरण प्रणालीतील रॉकेलप्रकरणी दोघांना शिक्षा
2 उजनी थेट पाइपलाइन पाणी योजनेत दररोज ७० लाख लिटर पाणी वाया
3 आम आदमी पार्टीची जिल्हा कार्यकारिणी स्थापन
Just Now!
X