रस्त्यावर दोन गटात चाललेली सशस्त्र हाणामारी सोडविण्यासाठी गेलेल्या एका सहायक पोलीस आयुक्तावर कुऱ्हाडीने प्रहार करण्यात आला. जुन्या पुणे नाक्याजवळील हांडे प्लाट येथे घडलेल्या या घटनेप्रकरणी आठजणांविरुध्द खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी दोघांना अटक केली असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.
हांडे प्लाट येथे सुशील गोरख गायकवाड (वय ३२, रा. कारंबा, ता. उत्तर सोलापूर) याने आपल्या विवाहित मुलीला तिच्या सासरी त्रास दिला जात असल्याची समजूत करून घेत आपल्या साथीदारांसह अंबादास रामचंद्र देशमुख यांच्या घरात येऊन त्यांना मारहाण केली. त्याची सून अनिता ही मारहाण सोडविण्यासाठी आली असता तिला ढकलून देत तिच्यावर कुऱ्हाडीने वार केला. देशमुख यांची पत्नी रतन तसेच मुलगा हे धावून आले असता त्यांनाही मारहाण झाली. दरम्यान, सहायक पोलीस आयुक्त सी. आर. रोडे (वय ५४) हे तेथून जात असताना त्यांनी हाणामारीचे दृश्य पाहून त्याठिकाणी धावून आले. परंतु हस्तक्षेप करीत असताना हल्लेखोरांनी पोलिसांनाही सोडू नका, असे म्हणत रोडे यांच्यावर कुऱ्हाडीने प्रहार केला. यात त्यांच्या डोक्यास जखम झाली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 29, 2013 1:13 am