News Flash

कुख्यात गुंड भरत त्यागीचा भरदुपारी खून

येथील कुख्यात गुंड भरत त्यागी याचा जयसिंगपूर येथे मध्यवर्ती ठिकाणी रविवारी दुपारी बंदुकीतून गोळ्या झाडून व चाकूने वार करून निर्घृण खून करण्यात आला.

| August 12, 2013 02:00 am

येथील कुख्यात गुंड भरत त्यागी याचा जयसिंगपूर येथे मध्यवर्ती ठिकाणी रविवारी दुपारी बंदुकीतून गोळ्या झाडून व चाकूने वार करून निर्घृण खून करण्यात आला. मोटारीतून आलेल्या हल्लेखोरांनी अवघ्या पाच मिनिटांत त्यागी याचा खून करून मोटारीतूनच पलायन केले. त्यागी याच्यावर दोन खुनांसह सात गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल असून त्याच्या खुनामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील गुन्हेगारी जगतात खळबळ उडाली आहे. पोलिस अधीक्षकांसह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. तपासासाठी दोन पथके रवाना झाली आहेत. जयसिंगपूर पोलिसांना खूनप्रकरणातील चार संशयित आरोपींची नांवे निष्पन्न झाली आहेत.
त्यागी हा मूळचा कोल्हापुरातील सिद्धार्थनगर (बुधवार पेठ) येथील आहे. तेथील गुन्हेगारी जगतात त्याचे नाव सतत येत होते. त्यामुळे तो गेल्या पाच वर्षांपूर्वी यड्राव (ता. शिरोळ) येथे वास्तव्यास आला होता. इचलकरंजी शहरातील शिवसेना माजी उपशहरप्रमुख बाबासाहेब जामदार आणि यड्राव येथील रमेश बुरुंगे याच्या खूनप्रकरणात तो संशयित आरोपी होता. दोन्ही खूनखटल्यातून त्याची निर्दोष मुक्तता झाली होती. बुरुंग खूनखटल्याचा दोन महिन्यांपूर्वीच निकाल लागला होता. त्यानंतर तो इचलकरंजी शहराबाहेरच होता.
रविवारी तो जयसिंगपूर येथे कामानिमित्त एकटाच गेला होता. तेथील प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ असलेल्या प्रकाश बारमध्ये त्याने मद्यप्राशन केले. तेथून तो बाहेर पडून जवळच असलेल्या शहा पेट्रोल पंपाजवळ आला होता. तेथेच त्याला हल्लेखोरांनी गाठले. सफारी गाडीतून (एमएच ०९ एक्यू २४७३) आलेल्या हल्लेखोरांनी प्रथम चाकूने हल्ला केला. त्यात तो खाली कोसळल्यानंतर हल्लेखोरांनी बंदुकीतून त्याच्यावर सहा गोळ्या झाडल्या. मान, छाती, पाय आणि पोटावर चार गोळ्या लागल्या. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. कोल्हापूर-सांगली रस्त्यावर मध्यवर्ती ठिकाणी झालेल्या हल्ल्याच्या घटनेमुळे  खळबळ उडाली.
खुनाचा प्रकार घडल्यानंतर तेथे बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. पोलिस अधीक्षक विजयसिंह जाधव, पोलिस उपाधीक्षक दिलीप कदम, सहायक पोलिस निरीक्षक जयसिंह रिसवडकर, गणेश लोकरे आदी वरिष्ठ अधिकारी तातडीने घटनास्थळी उपस्थित झाले. मिरज येथील शासकीय रुग्णालयात  शवविच्छेदन करण्यात आले.  
रमेश बुरुंगे याचा पार्वती औद्योगिक वसाहतीतील वर्चस्वाच्या वादातून २८ मे २००८ रोजी धारदार शस्राने यड्राव फाटानजीक निर्घृणपणे खून करण्यात आला होता. या खूनखटल्याप्रकरणी हातकणंगले पोलिसांनी भरत त्यागी ऊर्फ कांबळे याच्यासह सातजणांना अटक केली होती. या खुनाचा बदला घेण्यासाठीच त्यागी याचा खून केल्याचा पोलिसांचा कयास आहे. ४ ते ५ हल्लेखोर असल्याचे व ते सांगलीच्या दिशेने फरारी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. रात्री उशिरा चौघा हल्लेखोरांची नावे जयसिंगपूर पोलिसांनी निष्पन्न केली. हल्लेखोरांनी वापरलेली गाडी ही इचलकरंजीतील व्यापारी नंदकिशोर जाजू यांची असून एक वर्षापूर्वी त्यांनी ही गाडी विक्रीसाठी एजंट सादिक ऊर्फ रसुल इमाम बागवान (रा. मुक्त सैनिक वसाहत) याच्याकडे दिली होती. त्यामुळे पोलिसांनी चौकशीसाठी बागवान यास ताब्यात घेतले आहे. ही मोटार ट्रायलसाठी जावेद नामक तरुणाने नेल्याचे चौकशीत पुढे आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 12, 2013 2:00 am

Web Title: murder of infamous hooligan bharat tyagi
Next Stories
1 जिल्हा बँकेने फुकटचे श्रेय लाटू नये, अन्यथा सरकार वेगळे धोरण स्वीकारेल- विखे
2 सावेडी परिसरात चोरटय़ांचा धुमाकूळ, मारहाणीत ५ जखमी
3 गट नं १५च्या बेकायदा वाटपप्रकरणी कार्यकर्त्यांचे जलसमर्पण
Just Now!
X